शासनाने पिकांच्या हानीचा केलेला पहाणी अहवाल ग्राह्य धरून शेतकर्‍यांना पीक विम्यास पात्र ठरवणार ! – दादा भुसे, कृषीमंत्री

दादा भुसे, कृषीमंत्री

विधानसभा प्रश्‍नोत्तरे…

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – शेतकर्‍यांच्या पिकांची हानी झाल्यानंतर ७२ घंट्यांच्या आत पीक विम्यासाठी आस्थापनांकडे माहिती देणे बंधनकारक आहे; मात्र शेतकर्‍यांच्या ७२ घंट्यांनंतरही पिकांच्या हानीची माहिती विमा आस्थापनांनी ग्राह्य धरावी. शासनाने पिकांच्या हानीचा केलेला पहाणी अहवाल ग्राह्य धरून शेतकर्‍यांना पीक विम्यास पात्र ठरण्यास विमा आस्थापनांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी ५ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली. धाराशिव जिल्ह्यातील हानीग्रस्त शेतकर्‍यांना पीक विम्याची हानीभरपाई देण्यात यावी, असा प्रश्‍न सदस्य कैलास घाडगे यांनी विचारला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.