सातारा, ४ मार्च (वार्ता. ) – येथील तहसील आणि प्रांत कार्यालय यांसाठी नवीन इमारत उभारणी आवश्यक आहे. त्याविषयी शासनाकडे दिलेला प्रस्ताव तात्काळ संमत करण्यात यावा. तसेच यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुंबई येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.
खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘सातारा प्रांत आणि तहसील कार्यालय ब्रिटीशकालीन इमारतीमध्ये चालू आहे. याच परिसरात वन विभागाचे कार्यालय होते; मात्र त्यांना स्वतंत्र जागा मिळाल्याने ते तिकडे हालवण्यात आले आहे. दिवसेंदिवस प्रांत आणि तहसील कार्यालयावर ताण येत असून उपलब्ध इमारत, आवार अल्प पडू लागले आहेत. तसेच याठिकाणी मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय, निवडणूक शाखा, नगर भूमापन केंद्र, सेतू आदी कार्यालये आहेत. त्यामुळे दरदिवशी शेकडो लोक येथे येतात. नागरिक, कर्मचारी आणि अपुरे कार्यालय यांमुळे या ठिकाणाला कोंढवाड्याचे स्वरूप आले आहे. यासाठी येथे बहुमजली इमारत उभी रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव संमत करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.
या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘अशी मागणी यापूर्वी कुणीच का केली नाही ?’, असा प्रश्न उपस्थित करत प्रांत आणि तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीस मान्यता देण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.