विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

पदवीप्रदान सोहळा, लोणी काळभोर, पुणे

पुणे – पदवीधर तरुणांनी डोळ्यासमोर ध्येय ठेवून वाटचाल करावी. जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय, मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती अंगी बाणवून ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प जोपासावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. लोणी काळभोर येथील एम्.आय.टी. आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापिठाच्या ऑनलाईन तिसर्‍या पदवीप्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, डिझाईन किंवा अन्य कोणत्याही शाखेचे शिक्षण घेत असतांना अध्यात्माचा अभ्यास करायला हवा. नोकरीसाठी शिक्षण न घेता भविष्यात इतरांना नोकरी देणारे होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम्.आय.टी. आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापिठाचे अध्यक्ष आणि कुलगुरु डॉ. मंगेश कराड यांनी, तर प्राध्यापक स्नेहा वाघटकर आणि प्राध्यापक अशोक घुगे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापिठाच्या वतीने पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील १ सहस्र २३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे, ३ विद्यार्थ्यांना पी.एच्.डी., तर २२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

या वेळी इस्रोचे माजी संचालक डॉ. के. राधाकृष्णन्, एम्.आय.टी. एडीटी विद्यापिठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, विद्यापिठाचे प्र-कुलगुरु डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश देशपांडे, तसेच माईर्स एम्.आय.टी. ग्रूपचे कार्याध्यक्ष राहुल कराड आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.