वाई (जिल्हा सातारा) येथील पोलिसांनी दुकाने फोडणार्‍या चोरांची गावातून काढली धिंड !

सातारा – वाई (जिल्हा सातारा) येथील मध्यवस्तीमधील गणपती आळी येथे असणारी काही दुकाने चोरांनी कटावणीच्या साहाय्याने फोडून ५२ सहस्र ३०० रुपये चोरून नेले होते. याविषयीची तक्रार दुकानदारांनी वाई पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानुसार तपासाची चक्रे गतीमान करत वाई पोलिसांनी दरोडेखोरांना अटक केली आणि वाई शहरातून त्यांची धिंड काढली.

वाई शहरातील गल्ली-बोळातील गुंड चोर्‍या-दरोडे घालत दहशत माजवत होते. पोलिसांनी त्यांना अटक करून धिंड काढल्याने शहरातील त्यांची दहशत मोडीत निघाली आहे. यापूर्वीही संशयितांवर अनेक गुन्हे नोंद आहेत. आता त्यांना पोलीस प्रशासनाने सीमापार (तडीपार) करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.