पुणे – सध्या संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी आणि जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योगसाधना एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार २०२० चे वितरण करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे मन कार्य करते. त्यामुळे चांगले विचार करून त्यानुसार कृती करा. जीवनात वाटचाल करतांना जो मार्ग निवडला आहे तो मार्ग सत्य आहे असे समजून त्यानुसार कर्म करणे आपला अधिकार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना योगाच्या प्रोत्साहन आणि विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाविषयी तर योगाचार्या संध्या दिक्षीत यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा आणि योगाच्या प्रसाराविषयी सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
योग ही देश, विश्व आणि संस्कृतीची ताकद आहे. योगामुळे शरीर, मन आणि चेतना यांचा विकास होतो. योग ही प्राणाची शक्ती आहे, असे मत अप्पर पोलीस महासंचालक डॉ. उपाध्याय यांनी व्यक्त केले.
योगाचार्या संध्या दिक्षीत यांनी पुरस्कार प्रदान केल्याविषयी संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष महेशानंद, सचिव ओमप्रकाश तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्राध्यापक आर्.एस्. भोगल यांच्यासह संस्थेतील योग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल त्रिवेदी यांनी केले तर आभार सुबोध तिवारी यांनी व्यक्त केले.