शेतकर्‍यांची वीज तोडल्यास गाठ माझ्याशी आहे !

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची वीज वितरण आस्थापनेला चेतावणी  

प्रवीण दरेकर

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. ज्या शेतकर्‍यांच्या जिवावर सत्ता मिळवली त्याच शेतकर्‍यांच्या जिवावर हे सरकार उठले आहे. शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज कापून आघाडी सरकारने अयोग्य कृती केली आहे. शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज तोडाल, तर गाठ माझ्याशी आहे, अशी चेतावणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा वाढदिवस असल्याने ते श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोमय्या यांच्यासमवेत येथे आले होते.

१. या वेळी दरेकर म्हणाले की, राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अडचणीत आहे. अशा संकट काळात शेतकर्‍यांच्या शेतीपंपाचे वीजदेयक माफ करावे, यासाठी राज्यभरात आंदोलने केली; मात्र या सरकारला जनतेचा आवाज ऐकू आला नाही, त्यामुळे शेतकर्‍यांवर कारवाई चालू केली. त्यानंतर प्रवीण दरेकर आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाजप पदाधिकारी शिरीश कटेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

२. आजवर महाराष्ट्रात अनेकवेळा बेकायदा उद्घाटने झाली; पण कुणावरही गुन्हा नोंद झालेला नाही मग जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार्‍या गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा का नोंद केला ?