मालवण – मालवण पंचायत समितीने ‘ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘स्वच्छता पंधरवडा अभियान’च्या माध्यमातून लवकरच या मोहिमेचा शुभारंभ केला जाईल, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव आणि उपसभापती राजू परुळेकर यांनी दिली. (ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेणार्या मालवण पंचायत समितीचे अभिनंदन ! – संपादक)
मालवण पंचायत समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी या उपक्रमास पाठिंबा दर्शवत अभियानाचे स्वागत केले आहे. मालवणचा प्रमुख ऐतिहासिक ठेवा असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यासह भरतगड, मसुरे; भगवंतगड, चिंदर; सिद्धगड, ओवळीये, तसेच कुडोपी माळरानावर असलेली कातळशिल्पे, यांसह मालवण तालुक्यातील अन्य ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. ऐतिहासिक ठेवा स्वच्छ-सुंदर रहावा. पर्यटक, इतिहासप्रेमी यांच्यापर्यंत तो योग्य पद्धतीने पोचावा, हाच यामागील उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले. लवकरच अभियानाचा दिवस निश्चित करून सर्वांच्या सहभागातून ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ होईल, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी दिली.