काजूला योग्य मूल्य न मिळाल्यास शेतकरीच काजू खरेदी करणारा शोधणार !

सावंतवाडी – योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी चांगले मूल्य देणारा खरेदीदार (काजू खरेदी करणारा व्यापारी) शोधून त्याला काजू विक्री करतील. त्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळबागायतदार संघ गावागावात काजू खरेदी करून चांगला भाव देणार्‍या खरेदीदाराला देतील, असा निर्णय सावंतवाडी-दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळबागायतदार संघाच्या डेगवे येथील श्री माऊलीदेवी मंदिरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी काजू खरेदी-विक्री करण्यावर चर्चा झाली. बागायतदारांनी योग्य खरेदीदार शोधण्याचा प्रयत्न केला, तर कुठल्याही व्यापार्‍याने खरेदीला आडकाठी करू नये, यासाठी प्रथम व्यापारी आणि कारखानदार यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले. काजूला खर्चाच्या तुलनेत मूल्य अल्प मिळते. काजूचे पीक घेणार्‍या शेतकर्‍याच्या परिस्थितीत सुधारणा होत नाही; मात्र काजू खरेदी करणारा व्यापारी, कारखानदार अधिकाधिक श्रीमंत होत गेला. शेतकरी संघटित नसल्याने त्यांना योग्य भाव मिळत नाही. ही परिस्थिती पालटणे आवश्यक असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. काजूला योग्य भाव मिळावा, यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न केले जातील. त्यासाठी शेतकर्‍यांनीही संघटनेला सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.