सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला कारिवडेवासियांचा विरोध

सावंतवाडी – शहर नगरपरिषदेच्या वतीने कारिवडे येथे उभारण्यात आलेला घनकचरा प्रकल्प चालू करण्यास कारिवडे ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत तो प्रकल्प गावात होऊ देणार नाही. नगराध्यक्ष संजू परब यांनी आमच्याशी चर्चा करणे अत्यावश्यक होते; मात्र तसे न करता थेट प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या हालचाली चालू आहेत, असा आरोप कारिवडे गावच्या सरपंच सौ. अपर्णा तळवणेकर आणि आनंद तळवणेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

या वेळी सरपंच सौ. तळवणेकर पुढे म्हणाल्या, ‘‘प्रदूषणकारी आणि लोकांच्या आरोग्याच्या जिवावर उठणारा हा प्रकल्प राबवतांना स्थानिक लोकांना विश्‍वासात घेतले जात नाही. आम्ही वारंवार नगरपरिषदेचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकल्पामुळे गावातील लघु पाटबंधारे प्रकल्पाला हानी पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे याविषयी तात्काळ योग्य ती भूमिका सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने घ्यावी. आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणारा हा प्रकल्प तात्काळ थांबवा अन्यथा आम्ही आंदोलन करू.’’