मडगाव, १८ जानेवारी (वार्ता.) – ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळी सुमारे ३ वर्षांपूर्वी फेस्ताचे आयोजन करण्यास प्रारंभ झाला. प्रारंभी फेस्ताचे आयोजन करण्यास येथे खूप विरोध झाला. या ठिकाणी ‘नोव्हेना’ (प्रार्थना सभा) होऊ नये. यासाठी खूप विरोध झाला. मी पुरातत्व खात्याचा मंत्री असतांना मंत्री या नात्याने तातडीने सर्व अधिकार्यांची बैठक बोलावून वारसास्थळाचे जतन करण्यासाठी आणि त्या ठिकाणी फेस्ताचे आयोजन करण्यासाठी रस्ता बांधणे, वाटेवरील झाड कापणे आदी कामे विक्रमी वेळेत पूर्ण केली. सेंट जोसेफ वाझ यांना मानणार्यांना पाठिंबा देणे सरकारमधील घटक या नात्याने माझे कर्तव्य होते. ख्रिस्ती धर्मात आर्चबिशप यांना सर्वांत मोठे स्थान आहे. या प्रकरणी आर्चबिशप यांच्या आज्ञेने प्रारंभीची २ वर्षे फेस्ताचे निर्विघ्नपणे आयोजन झाले, अशी माहिती पुरातत्व खात्याचे माजी मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. चंद्रवाडा, मडगाव येथे सेंट जोसेफ वाझ कम्युनिटी कोर्टयार्डच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘मला सरकारने मंत्रीमंडळातून बाहेर काढल्यानंतर ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे पूर्वी मंदिर होते’, असे सांगणारे पुन्हा पुढे येऊ लागले. यंदाही सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे आणि ‘नोव्हेना’चे आयोजन करण्यास अनेक अडथळे आले. यंदा ‘नोव्हेना’ होणार कि नाही’, असे स्थानिक ख्रिस्त्यांना वाटत होते, तरीही यंदा १६ जानेवारीला त्या ठिकाणी सेंट जोसेफ वाझ यांचे फेस्त आणि नोव्हेना झाले. मी जन्माने हिंदु असूनही ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसास्थळ आणि चर्च यांचे रक्षण केले. गतवर्षी काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपात प्रवेश केला आणि यामधील ८ आमदार हे ख्रिस्ती आहेत. या ख्रिस्ती आमदारांनी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाचे जतन करण्यासाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत आणि त्यांनी प्रयत्न केल्यासही त्यांचे सरकार ऐकणार नाही. गावात धार्मिक सलोखा टिकून रहाणे आवश्यक आहे. सेंट जोसेफ हा ख्रिस्त्यांचा गोव्यातील एकमेव संत आहे आणि त्याचे फेस्त चांगल्या रितीने साजरे व्हावे, असे सरकारला वाटत नाही. २ धर्मांमध्ये भांडण लावणार्यांना आज घरी पाठवणे आणि धार्मिक सलोखा टिकवणार्यांना पुढे काढणे आवश्यक आहे.
खोटी अनुमती घेऊन धार्मिक सलोखा बिघडवणारे ख्रिस्ती !सेंट जोसेफ वाझ यांचे फेस्त पूर्वी सांकवाळ येथे वारसास्थळाच्या सुमारे ६ कि.मी. दूर असलेल्या एका चर्चच्या ठिकाणी होत असे; मात्र गेल्या ४ वर्षांपासून स्थानिकांचा विरोध होत असूनही ख्रिस्ती शंखवाळी तीर्थक्षेत्र या वारसास्थळी असलेल्या ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’ या चर्चच्या ठिकाणी सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे आयोजन करतात. यंदा १६ जानेवारी या दिवशी सलग चौथ्या वर्षी या ठिकाणी सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे आयोजन केले गेले. सर्व्हे क्रमांक ६ कि.मी. दूर असलेल्या ठिकाणचा देऊन वारसास्थळी अनधिकृतपणे फेस्ताचे आयोजन केले जात असल्याचा सांकवाळ येथील स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे धार्मिक सलोखा कोण बिघडवत आहे, ते या माहितीतून दिसून येते. |