सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ३१० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण !

महापालिकेच्या वतीने रुग्णालयांची पडताळणी करतांना अग्नीशमन अधिकारी आणि त्यांचे पथक

सांगली, १५ जानेवारी (वार्ता.) – भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्नीशमन विभागाला महापालिका क्षेत्रांतील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मागील ३ दिवसांत अग्नीशमन अधिकारी आणि त्यांचे पथक यांच्याकडून प्रत्यक्ष भेटी देऊन अग्नीशमन यंत्रणेची पडताळणी घेऊन ३८६ पैकी ३१० रुग्णालयांचे फायर ऑडिट करून त्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

अशाच प्रकारे कोणत्याही आस्थापनांना अग्नीशमन विभागाकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्या आस्थापनांनी किंवा रुग्णालयांनी त्यांचा अग्नीशमन दाखला घेतलेला नाही किंवा अग्नीसुरक्षा यंत्रणा बसवलेली नाही, त्यांनी तातडीने बसवून घ्यावी. महापालिकेच्या पहाणीत अग्नीसुरक्षा यंत्रणा आढळून आली नाही किंवा दाखला नसल्याचे निदर्शनास आले, तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी चेतावणी अग्नीशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी दिली आहे.