जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे १० सहस्र ६६० डोस उपलब्ध !

सिंधुदुर्ग- कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ १६ जानेवारी दिवशी होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला लसीचे १० सहस्र ६६० डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही मोहीम जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी आणि उपजिल्हा रुग्णालय, कणकवली या तीन रुग्णालयांमध्ये चालू होत आहे. या तिन्ही रुग्णालयांमध्ये यापूर्वी नोंदणी केलेले आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. शुभारंभाच्या दिवशी या तिन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री, साहित्य यासंदर्भातील पूर्वसिद्धता करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.