अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून ही डागडुजी का करत नाही ? जे पालकांना दिसते, ते जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का ?
दोडामार्ग – तालुक्यातील झरेबांबर, गावठाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली असून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. शाळेची इमारत तात्काळ दुरुस्त करावी, जोपर्यंत दुरुस्ती केली जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले जाणार नाही. त्यांना शाळेच्या पटांगणात उभे करून आंदोलन करणार, अशी चेतावणी पालक आणि ग्रामस्थ यांनी दिली. ‘या आंदोलनात आम्हीही सहभागी होणार’, असे झरेबांबरच्या सरपंच सौ. स्नेहा गवस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सरपंच सौ. स्नेहा गवस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, झरेबांबर गावठाणवाडी येथील जि.प. शाळा क्रमांक १ या शाळेच्या इमारतीमध्ये पहिली ते चौथीपर्यंत वर्ग चालू असून २० विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत; पण या शाळेच्या इमारतीचे छत मोडकळीस आले आहे. वर्गखोल्यांमध्येही पडझड झाली आहे. पुढील काळात त्या वर्गात मुले बसल्यास त्यांच्या जीवितास धोका आहे.
यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सौ. धनश्री गवस म्हणाल्या, ‘‘प्रतिनिधी म्हणून मी पालकांसमवेत आंदोलनासाठी उपस्थित रहाणार आहे. गटशिक्षण अधिकारी यांच्या समवेत मी शाळेच्या इमारतीची पहाणी केली आहे. त्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवून पाठपुरावा करणार आहे.’’
या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा नाईक यांनीही ‘या शाळेच्या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा पालक आणि ग्रामस्थ यांनी घेतलेल्या निर्णयाशी मी सहमत राहून आंदोलनात सहभागी होणार’, असे त्यांनी सांगितले.