श्री तुळजाभवानी मंदिरातील ८ पुजार्‍यांना ३ मास प्रवेश बंदीचे आदेश

१६ पुजार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी मंदिरात बेशिस्त वर्तन करणे, तसेच नियमांचे पालन न करणे या कारणांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने ८ पुजार्‍यांना ३ मास मंदिर प्रवेश बंदीचे आदेश काढले आहेत, तर अन्य १६ पुजार्‍यांना सहा मासांसाठी श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेशबंदी का करण्यात येऊ नये, याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (मंदिर प्रशासनाने पुजार्‍यांसमवेत समन्वय करून मंदिराची नियमावली निश्‍चित करणे अपेक्षित आहे. तसे केल्याने पुजार्‍यांना येणार्‍या अडचणीही मंदिर प्रशासनाच्या लक्षात येतील आणि नियम निश्‍चित करण्याचा मुख्य उद्देशही साध्य होईल. पुजारी आणि भाविक यांना  विश्‍वासात न घेता नियमावली निश्‍चित करणे हे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत, हे लक्षात घ्यावे ! – संपादक) 

१. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे उल्लंघन आणि बेशिस्त वर्तन केल्याने देऊळ कवायत कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही प्रवेशबंदीची कारवाई केली आहे.

२. श्री तुळजाभवानी देवीच्या गाभार्‍यात प्रवेश मिळण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली तीनही पुजारी मंडळांची बैठक पार पडली. त्यामध्ये पुजार्‍यांना मंदिराच्या भवानी शंकर गेटद्वारे भागार्‍यात प्रवेश देण्याचे निश्‍चित झाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाकंभरी नवरात्रोत्सवात उपायोजना आणि नियमांचे पालन करण्याचे बैठकीमध्ये निश्‍चित झाल्याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली.