ब्रिटनमधून गोव्यात आलेल्या प्रवाशांपैकी आतापर्यंत १६ प्रवासी कोरोनाबाधित

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी – गोव्यात ८ डिसेंबरपासून ब्रिटनमधून ९०० प्रवासी आले. यांपैकी ४२५ जणांची आतापर्यंत कोरोनाशी संबंधित चाचणी करण्यात आली. यांपैकी १६ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. या १६ प्रवाशांचे कोरोनाशी संबंधित नमुने ‘जिनॉमिक’ चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. या ठिकाणी या १६ जणांना ब्रिटनमध्ये आलेल्या नवीन कोरोनाच्या पुढच्या टप्प्याच्या संसर्गाची लागण झाली आहे का, हे तपासले जाईल.

गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे ३ मृत्यू, तर ६१ नवीन रुग्ण

गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून दिवसभरात केलेल्या १ सहस्र २०५ चाचण्यांमधून ६१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. नवीन ६१ पैकी ४८ रुग्णांनी गृहअलगीकरणाचा पर्याय निवडला आहे. (याचाच अर्थ कोरोनावर अद्याप कोणतेही उपचार नसून घरी राहून घरगुती आणि आयुर्वेदीय उपचार हाच त्यावरील उपाय आहे. – संपादक) यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९५१ झाली आहे. दिवसभरात ८७ रुग्ण बरे झाले.