पणजी, २६ डिसेंबर (वार्ता.) – उसगाव, फोंडा येथील गोव्यातील एकमेव गोवा मांस प्रकल्प शासन चालू करण्याच्या सिद्धतेत आहे. हा प्रकल्प आम्ही कधीही चालू करू शकतो, अशी माहिती गोवा मांस प्रकल्पाचे महासंचालक प्रभुगावकर यांनी २ दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिली. कर्नाटक शासनाने विधानसभेत गोहत्या बंदी विधेयक संमत केल्यानंतर गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासू नये, यासाठी चर्च संस्था, गोमांस विक्रेते, तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील आमदार यांनी गोवा शासनावर दबाव आणला. राज्यातील गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आदेशावरून राज्याचे पशूसंवर्धन खाते आणि गोमांस विक्रेत्या संघाचे ५ सदस्य यांच्यामध्ये एक बैठक झाली होती. यामध्ये गोव्यात गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी कर्नाटकस्थित २ संस्था गोव्यात गोमांस विक्रेत्यांना गोमांसाचा पुरवठा करणार असल्याचे सांगण्यात आले. गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्या गोवा शासनाचे गोमांस विक्रेत्यांनी आभार मानले आहेत.