सिल्लोड येथे साहाय्यक वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या !

आगारप्रमुखासह तिघांवर गुन्हे नोंद !

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) – येथील ‘राज्य परिवहन मंडळा’च्या आगारात कार्यरत असलेले साहाय्यक वाहतूक नियंत्रक शरद भिवसने (वय ४० वर्षे) यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हृदयविकाराच्या आजारामुळे रजेवर असलेल्या भिवसने यांना कर्तव्यावर रुजू होतांना आगारप्रमुख आणि अन्य अधिकारी यांनी अवमानित केल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी आगारप्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

शरद भिवसने मागील १ महिन्यापासून हृदयविकाराच्या आजारामुळे वैद्यकीय रजेवर होते. त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांनी सिल्लोड आगारातच नियुक्ती मिळण्यासाठी आवेदन केले होते. ८ एप्रिल या दिवशी सकाळी ९ वाजता ते आगारात उपस्थित होण्यासाठी गेले. या वेळी आगारप्रमुख विजय काळवणे, साहाय्यक वाहतूक अधिकारी किरण अवसरमल आणि विकास चव्हाण यांनी भिवसने यांच्या पेहरावावरून (मळलेले कपडे, चप्पल आणि दाढी) त्यांना अश्लाघ्य भाषेत अवमानित केले.

अधिकार्‍यांनी केवळ त्यांच्या पेहरावावरच नव्हे, तर त्यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण केले. हा अवमान सहन न झाल्याने भिवसने यांनी दुपारी १२ च्या सुमारास भराडी रस्त्यावरील एका विहिरीत उडी घेतली. मृताचे भाऊ पोपट भिवसने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित तिन्ही अधिकार्‍यांच्या क्रूर वागणुकीमुळेच शरद यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील अन्वेषण चालू केले आहे.