मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला जयगड येथे नवा थांबा

रो-रो नौका थांबण्यास आरंभ होईल- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी – मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा आता अधिक विस्तारित होणार आहे. या मार्गावर आता रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला हे २ नवीन थांबे दिले जाणार आहेत. या २ नव्या थांब्यांसाठी आवश्यक असलेल्या जेट्टीचे काम सध्या वेगात चालू आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. येत्या एका महिन्यात या जेट्टींचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर येथे रो-रो नौका थांबण्यास आरंभ होईल.

१. जयगड थांबा हा थांबा औद्योगिक विकास आणि बंदर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, तर वेंगुर्ला थांब्यामुळे मालवण, तारकर्ली आणि आचरा यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देणे पर्यटकांना अधिक सोपे होईल. यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

२. या जलवाहतूक सुविधेमुळे मुंबईत वाहतूक करणार्‍या कोकणवासियांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. रस्ते मार्गापेक्षा जलमार्ग हा एक सुखकर आणि जलद पर्याय ठरणार आहे.

३. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून नेरुळ ते मुंबई अशी नवी जलवाहतूक सेवाही लवकरच चालू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

४. नवीन जेट्टी कार्यान्वित झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनारी भाग थेट जलमार्गाने एकमेकांशी जोडले जातील. याचा लाभ स्थानिक मत्स्यव्यवसाय आणि व्यापारालाही होईल.