शिवजयंतीनिमित्त आज सरसगड (तालुका सुधागड पाली) दुर्ग प्रदक्षिणा !

तरुण पिढीला इतिहास आणि राष्ट्राभिमान यांची जाणीव करून देण्याचा स्तुत्य उपक्रम !

सरसगड

पनवेल – सुधागड-पाली येथे शिवजयंतीनिमित्त ‘सुधागड संघर्ष संस्थे’च्या पुढाकाराने ऐतिहासिक सरसगड येथे १९ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता दुर्ग प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्त आणि दुर्गप्रेमी यांनी उपक्रमात सहभागी होऊन शिवचरित्राचा आदर्श आचरणात आणावा, असे आवाहन ‘सुधागड संघर्ष संस्थे’च्या वतीने करण्यात आले आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासह तरुण पिढीला गड-दुर्गांविषयी जागरूक करण्ो हा यामागील उद्देश आहे. सरसगड हा प्राचीन ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपणारा गड आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

प्रदक्षिणेच्या मार्गावरील स्वच्छता आणि दिशादर्शक चिन्हे यांची नोंद करण्यात आली आहे. प्रदक्षिणेत सहभागी होण्यासाठी नाममात्र १०० रुपये नोंदणी शुल्क ठेवले आहे. शिस्त आणि स्वच्छता यांचे नियम पाळणे सर्वांना बंधनकारक राहील.

सरसगड प्रदक्षिणेचे हे द्वितीय वर्ष असून या मोहिमेद्वारे गडाचा इतिहास आणि त्याभोवतीचा नैसर्गिक ठेवा जवळून अनुभवता येईल. रायगड प्रदक्षिणेच्या धर्तीवर आयोजित ही मोहीम खडतर असली, तरी तो अविस्मरणीय अनुभव ठरेल. वर्ष २०२५ मध्ये दुर्ग प्रदक्षिणेलाही अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. – प्रदीप गोळे, आयोजक, सुधागड संघर्ष संस्था