नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या निमित्ताने गोव्यात ठिकठिकाणी ध्वनीप्रदूषण !

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २० ऑक्टोबर (वार्ता.) – दिवाळीच्या काळात ध्वनीप्रदूषणात वाढ होऊ नये, यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनीप्रदूषण करणार्‍यांना १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची चेतावणी दिली होती; मात्र तरीही राजधानी पणजीसह अनेक भागांतील नरकारसुर प्रतिमा करणार्‍या मंडळांनी याकडे दुर्लक्ष करून ध्वनीप्रदूषण केले. सांतीनेझ, पणजी येथे ध्वनीप्रदूषणाचा अनेकांना त्रास झाला. या वेळी अनेकांनी संगीत वाजवण्यासाठी कायद्याने निर्धारित केलेली आवाजाची मर्यादाही (१०० डेसिबलपेक्षा अधिक) ओलांडली. याचा त्रास त्या भागातील वृद्ध आणि आजारी नागरिक यांना सहन करावा लागला.

ध्वनीप्रदूषणासंबंधी नियमानुसार व्यावसायिक विभागासाठी दिवसा ६६, तर रात्री ५५ डेसिबल; निवासी विभागासाठी दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसिबल आणि संवेदनशील विभागासाठी दिवसा ५०, तर रात्री ४० डेसिबल, अशी आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. नरकासुर प्रतिमा बनवणार्‍या मंडळांकडून मोठ्या आवाजात संगीत (‘डीजे’ – मोठ्या आवाजात संगीत वाजवण्याची यंत्रणा) वाजवले जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी एक बैठक घेऊन कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार व्यावसायिक भागात रात्री १० वाजल्यानंतर संगीत वाजवणार्‍यांना १ लाख रुपयापर्यंत, तर इतर भागांमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍यांना पहिल्यांदा गुन्हा केल्यास २० सहस्र रुपये, दुसर्‍यांदा गुन्हा केल्यास ४० सहस्र रुपये आणि त्यानंतर गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्यास १ लाख रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पणजी पोलिसांनी दिवाळीच्या पूर्वी नरकासुराची प्रतिमा बनवणार्‍या मंडळांची एक बैठक घेऊन त्यांना ध्वनीप्रदूषणाच्या नियमांविषयी माहिती देऊन रात्री निर्धारित वेळेनंतर शांतता राखण्याच्या उद्देशाने निर्बंध लागू केले होते. ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना त्रास होऊ नये, यासाठी हे निर्बंध घातले होते.

पाटो, पणजी येथे पोलिसाची कारवाई

पणजी पोलिसांनी ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करतांना पाटो, पणजी येथे ध्वनी उपकरण (संगीत कन्सोल) कह्यात घेतले.

मळा परिसरात ध्वनीप्रदूषणावर कारवाई करतांना युवकांनी पोलिसांना आणला अडथळा

१९ ऑक्टोबरच्या रात्री ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पणजी पोलिसांचे पथक मळा, पणजी येथे ध्वनी उपकरणे कह्यात घेण्यासाठी गेले होते; मात्र युवकांनी पोलिसांना अडवून कारवाई करण्यास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अखेर ध्वनी उपकरणे कह्यात घेतली.

प्रतिकात्मक छायाचित्र

सांतीनेझ, पणजी येथे नरकारसुराची प्रतिमा अंगावर पडल्याने दोघे घायाळ

सांतीनेझ, पणजी येथे २० ऑक्टोबर या दिवशी पहाटे नरकासुराची प्रतिमा दहन केली जात असतांना दुर्घटना घडली. या वेळी नरकारसुराची प्रतिमा अंगावर पडल्याने २ जण घायाळ झाले.

माशे, काणकोण येथे नरकारसुर प्रतिमा स्पर्धेच्या मिरवणुकीच्या मार्गावरून २ गटांत हाणामारी : पोलिसांनी दोघांना घेतले कह्यात

काणकोण – माशे, काणकोण येथे आयोजित नरकासुर प्रतिमा स्पर्धेच्या मिरवणुकीच्या मार्गावरून २ गटांमध्ये प्रारंभी वाद निर्माण झाला आणि नंतर वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. या वादानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी लोलये येथील रॉनी फर्नांडिस आणि पैंगीण येथील राजेंद्र च्यारी यांना कह्यात घेतले. या दोघांना पुढे दंडाधिकार्‍यांसमोर उपस्थित करण्यात आले. दंडाधिकार्‍यांनी त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका केली.


होंडा, सत्तरी येथे तक्रार करणार्‍या व्यक्तीच्या वाहनाला आग लावली

प्रतिकात्मक छायाचित्र

सांखळी – सत्तरी तालुक्यात होंडा पोलीस चौकीच्या हद्दीत १९ ऑक्टोबरच्या रात्री ध्वनीप्रदूषणाची तक्रार करणार्‍या व्यक्तीच्या चारचाकी वाहनाला अनुमाने ३०० ते ४०० जणांच्या जमावाने आग लावल्याची घटना घडली. (आग लावणार्‍यांना तक्रारदाराचे नाव कसे समजले ? पोलिसांनी ते गुप्त का ठेवले नाही ? तक्रारदाराचे नाव उघड करणार्‍या पोलीस खात्यातील व्यक्तीवर कारवाई करा ! – संपादक) या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने वाळपई, डिचोली आणि आसपासच्या पोलीस ठाण्यांची पथके मागवण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार होंडा पोलीस चौकीच्या हद्दीतील एका स्थानिक रहिवाशाने नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या निमित्ताने वाजवण्यात येणार्‍या मोठ्या आवाजातील संगीताच्या विराेधात स्थानिक प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात तक्रार नोंदवल्याचे समजताच तेथे अनुमाने ३०० ते ४०० जणांचा जमाव जमला आणि यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर जमलेला जमाव उग्र झाला आणि त्यांनी तक्रार करणार्‍या व्यक्तीच्या वाहनाला आग लावली. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

ध्वनीप्रदूषणाविरुद्ध तक्रार करणार्‍या व्यक्तीच्या वाहनाला आग लावणारे नरकासुराचे वंशजच म्हटल्यास चूक ठरू नये !