RBI New Guidelines To Stop Fraud Calls : बँक कॉलच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केले २ क्रमांक

१६०० आणि १४० यांपासून प्रारंभ होणारे दूरभाष क्रमांक अधिकृत असणार !

नवी देहली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना त्यांच्या ग्राहकांना व्यवहार आणि प्रसार यांसाठी संपर्क (कॉल) करतांना वापरण्यासाठी २ दूरभाष क्रमांक चालू केले आहेत. या उपक्रमाचा उद्देश वापरकर्त्यांना फसव्या कॉल्सपासून संरक्षण देणे आणि कायदेशीर प्रक्रियेवर विश्‍वास वाढवणे हा आहे.

१. बँकांना आता सर्व व्यवहारांशी संबंधित कॉलसाठी १६०० पासून प्रारंभ होणारे दूरभाष क्रमांक वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रचार कॉल आणि लघु संदेशासाठी २ वेगवेगळे क्रमांक दिले आहेत. १६०० पासून चालू होणारे क्रमांक बँकिंग सेवांमधून प्रचार करण्यासाठी वापरले जातील, तर १४० पासून चालू होणारे क्रमांक वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा विमा यांसारख्या सेवा देणार्‍या कॉल आणि लघु संदेश यांंसाठी वापरले जातील.

२. या उपक्रमामुळे वापरकर्त्यांना बँकांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे भासवून फसवणूक करणार्‍यांच्या खोट्या दाव्यांपासून बँकेच्या खर्‍या प्रतिनिधी यांच्यातील भेद    ओळखण्यास साहाय्य होईल. घोटाळेबाज अनेकदा बँक प्रतिनिधी असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक करतात. रिझर्व्ह बँकेच्या या पावलामुळे ग्राहकांना लक्षणीय दिलासा मिळेल आणि आर्थिक सुरक्षितता वाढेल, अशी अपेक्षा आहे.