Contempt Of Marathi : महाराष्‍ट्र सरकारच्‍या ‘महावाचन उत्‍सव २०२४’च्‍या प्रशस्‍तीपत्रकात मराठीची अवहेलना !

(चित्रावर क्लिक करा)

मुंबई : महाराष्‍ट्र सरकारच्‍या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्‍या वतीने ‘महावाचन उत्‍सव २०२४’ या उपक्रमाच्‍या ३ ओळींच्‍या प्रशस्‍तीपत्रकात शुद्धलेखन, वाक्‍यरचना, व्‍याकरण आणि भाषा यांच्‍या तब्‍बल २५ चुका आहेत. यात प्रसिद्धी पत्रकातील एवढ्या भयंकर चुका पाहून मराठीची अवहेलना केल्‍याचे समोर आले आहे. हे प्रशस्‍तीपत्रक कुठल्‍याही सामान्‍य मराठी माणसाने वाचले, तरी यातील मराठी भाषेची दुःस्‍थिती पाहून त्‍याला दुःख झाल्‍याविना रहाणार नाही.

या पत्रकाच्‍या खाली मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्‍या स्‍वाक्षर्‍या आहेत. प्रशस्‍तीपत्रकात लिखाणाच्‍या वर एक खोडलेला मथळाही आला आहे. प्रशस्‍तीपत्रकात अशा प्रकारे खाडाखोड केली गेल्‍याने ते बरेही दिसत नाही.

पत्रकातील चुकांमध्‍ये पुढील सुधारणांची आवश्‍यकता –

महाराष्‍ट्र शासनाचे असंख्‍य चुका असलेले प्रशस्‍तीपत्रक !

१. ‘महावाचन उत्‍सव २०२४’ हे शब्‍द एकेरी अवतरणचिन्‍हात हवेत.
२. ‘महावाचन’ शब्‍द हा गटातून या शब्‍दाच्‍या आधी हवा.
३. ‘गतातून’ हा शब्‍द ‘गटातून’ असा हवा.
४. ९ आणि १२ हे अंक इंग्रजीत आहेत, ते मराठीत हवेत.
५.  ‘घेतलबादल’ शब्‍द ‘घेतल्‍याबद्दल’ असा हवा होता. (‘बद्दल’ हा शब्‍द परकीय असल्‍याने घेतल्‍या ‘प्रीत्‍यर्थ’ असेही म्‍हणू शकतो.)
६. ‘अपनास’ याऐवजी ‘आपणास’ असे हवे.
७. ‘संरक्षण पत्र’ याऐवजी ‘प्रशस्‍तीपत्र’ असे हवे.
८. ‘।’ याऐवजी ‘.’ (पूर्णविराम) असे मराठीत वापरले जाणारे चिन्‍ह हवे.
९.  ‘आपका वाचनच्‍या आवेदन और सक्रिय सहभागी हा निगम यशस्‍वी झाला है ।’ असे वाक्‍य आहे. यातील २ शब्‍द वगळता पूर्ण वाक्‍य चुकले आहे. याऐवजी ते ‘आपल्‍या सहभागामुळे हा उपक्रम यशस्‍वी झाला आहे.’ असे हवे.
१०. ‘नून टेवेल’ याऐवजी ‘नेऊन ठेवेल’ असे हवे.
११. ‘सादि नहीं।’ याऐवजी ‘संदेह नाही.’ असे हवे.
१२. ‘उत्‍सव’ याऐवजी ‘उत्‍सवात’ असे हवे.
१३. ‘आपका’ याऐवजी ‘आपले’ असे हवे.
१४. ‘अभिनंदन’ शब्‍द आणि उद़्‍गारचिन्‍ह यात जागा हवी.
१५. ‘आपलिया पुढिल वाचन यात्रासाथी’ याऐवजी ‘आपल्‍या पुढील वाचन प्रवासासाठी’ असे हवे.
१६. ‘शुभेच्‍छा’ शब्‍द आणि विरामचिन्‍ह यात जागा हवी.

संपादकीय भूमिका

  • सरकारी यंत्रणेकडून मराठीची एवढ्या मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असेल, तर त्‍या राज्‍यात मराठीचे भविष्‍य काय असेल, याचा विचारच न केलेला बरा !
  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी धडपडण्‍यापेक्षा शुद्ध मराठी लिहिली  आणि बोलली जावी, यासाठी अधिक धडपड होणे आवश्‍यक आहे !
  • ‘भाषा मरता देशही मरतो, संस्‍कृतीचाही दिवा विझतो !’, अशी स्‍थिती होऊ न देण्‍यासाठी प्रत्‍येक मराठी जनाने आणि मराठीसाठी लढणार्‍या पक्षांनी ठोस कृतीशील पुढाकार घेतला पाहिजे !