हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम
पणजी, ३० ऑगस्ट – ‘पिझ्झा’चे घरपोच वितरण करणार्या पर्वरी येथील ‘ला पिनोझ पिझ्झा’ या आस्थापनाने श्री गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या (‘पिझ्झा’ घरपोच वितरण करणार्या व्यक्तीच्या) रूपात दर्शवणारे विडंबनात्मक विज्ञापन हटवून त्या ठिकाणी श्री गणेशाचे नवीन चित्र लावले आहे. हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनानंतर विडंबनात्मक विज्ञापन हटवण्यात आले आहे.
श्री गणेशचतुर्थी सण जवळ येत असल्याने संबंधित आस्थापनाच्या पर्वरी येथील दुकानाच्या प्रवेशद्वारावर श्री गणेशाचे ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे चित्र रेखाटलेले होते. या चित्रात पँट आणि शर्ट घातलेला श्री गणेश सायकलवर बसलेला दाखवण्यात आला होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने आस्थापनाच्या मालकीण कु. कोमल सिंह यांची भेट घेतली. कु. कोमल सिंह यांना संबंधित विज्ञापनामुळे श्री गणेशाचे विडंबन झाल्याचे आणि यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले, तसेच ‘हिंदु शास्त्रानुसार मूर्ती कशी असावी ?’ याविषयी माहिती देण्यात आली. अनावधानाने हे विज्ञापन प्रसिद्ध केल्याचे कु. कोमल सिंह यांनी या वेळी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दिलीप कुंभार, अरविंद कुमार, हिंदु जनजागृती समितीचे राज बोरकर आणि सुशांत दळवी यांचा सहभाग होता.