उत्तर भारतात एका कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत नृत्य सादर करण्यात आले. हे नृत्य सात्त्विक नव्हते, तर त्यामध्ये विचित्र आधुनिक नृत्यप्रकार समाविष्ट केले होते. यावर वृंदावन येथील राधा-कृष्णाचे भक्त संत प्रेमानंद महाराज यांनी हिंदूंची कानउघाडणी केली आहे. ‘देवीदेवतांना मनोरंजनाचे साधन बनवू नका, अशा प्रकारे हिंदु देवीदेवतांचा अनादर करणे, हे महापाप आहे’, अशा शब्दांत त्यांनी हिंदूंना खडेबोल सुनावले आहेत. पाश्चात्त्य विकृतीचा आपले मन आणि बुद्धी यांवर इतका परिणाम झाला आहे की, आपण आपली स्वतःची संस्कृतीच विसरत चाललो आहोत. याला वेळीच तीव्र विरोध न केल्यास देवतांना अशा स्वरूपात पाहिल्याने पुढच्या पिढीच्या मनात देवतांविषयी श्रद्धा निर्माण होणे तर दूरच; पण ती देवतांचे पूजन करणेही नाकारेल.
कला हा ईश्वरी, दैवी गुण आहे. तो एक साधनेचा मार्ग आहे; परंतु आज परिस्थिती संपूर्णपणे पालटलेली आहे. आज जो येतो, तो हिंदु धर्मातील देवतांची हवी तशी विटंबना करतो आणि त्याला नाव देतो ‘कलेचे स्वातंत्र्य !’ यामध्ये हिंदूंच्या एक-दोन नव्हे, तर अनेक देवतांची चित्रे काढणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार मकबुल फिदा हुसेन असो किंवा चित्रपट, वेब सिरीज्, विज्ञापने या माध्यामांतून देवतांचे केलेले विडंबन असो, हिंदू सहिष्णु असल्यामुळे वारंवार हिंदु देवतांचा अपमान केला गेला आहे. विविध उत्पादने अन् त्यांची विज्ञापने यांसाठीही देवतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने देवतेच्या चित्राच्या चिंधड्या होतात. फटाक्यांवरील देवतांची चित्रे पायाखाली तुडवली जातात, तसेच नंतर ती कचर्यात टाकली जातात. यामुळे धर्महानीच होते.
हिंदु धर्माचे, देवतांचे विडंबन करण्यात सध्याच्या नाटककारांचाही मोठा वाटा आहे. नाटकांतून वंदनीय अशा देवतांना हास्यास्पद स्वरूपात दाखवून त्यांच्या तोंडी अश्लील संवाद दिले जातात. ज्या देवतांची श्रद्धापूर्वक पूजा करून आपण त्यांच्याकडे संकटात रक्षण करण्याची विनवणी करतो, त्याच देवतांना नाटकातील विनोदातून विटंबित होतांना पहाणे, आपल्यासमोर नृत्य करतांना पहाणे, यामुळे त्या पापकर्मातही आपण सहभागी होत असतो. याचे आपल्याला भानही रहात नाही. ‘रामायण’ प्रत्यक्षात घडून युगानुयुगे झाली, तरी वेगवेगळ्या रूपांत रामायणाची कथा मलेशिया, थायलंड, कंबोडिया आदी अनेक ठिकाणी सांगितली जाते. विश्व आपल्या साधनामार्गांकडे आकर्षिले जात असतांना आपण मात्र आपल्याच देवतांची खिल्ली उडवत आहोत. ‘देव आणि धर्म यांची विटंबना थांबवणे’, हे धर्मपालनच होय ! आपण जर धर्माचे रक्षण केले, तर धर्म (ईश्वर) आपले रक्षण करील. त्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देवतांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर ‘ईशनिंदाविरोधी कायद्या’ची आवश्यकता आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे