Supreme Court : गुन्हेगार जन्माला येत नाहीत, तर निर्माण होतात ! – सर्वोच्च न्यायालय

‘गुन्हेगार भविष्यात सुधारू शकत नाहीत’, असे मानता येणार नसल्याचेही मत व्यक्त !

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – गुन्हेगार जन्माला येत नाहीत, तर निर्माण होतात, अशी टीपणी सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी केली. फेब्रुवारी २०२० मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) मुंबईतील अंधेरी परिसरातून एका तरुणाला २ सहस्र रुपयांच्या १ सहस्र १९३ बनावट नोटांसह कह्यात घेतले होते. या बनावट नोटांची पाकमधून मुंबईत तस्करी झाली होती. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपीला जामीन संमत केला आहे.

तत्काळ खटला चालवणे, हा गुन्हेगाराचा मूलभूत अधिकार !

सुनावणीच्या वेळी न्यायालयाने म्हटले की, प्रत्येकामध्ये चांगली मानवी क्षमता असते. त्यामुळे ‘आता जे गुन्हेगार आहेत, ते भविष्यात सुधारू शकत नाहीत’, असे मानता कामा नये. गुन्हेगार, किशोरवयीन आणि प्रौढ यांच्याशी वागतांना अनेकदा मूलभूत मानवतावादी तत्त्वे चुकतात. जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा त्यामागे अनेक कारणे असतात; मग ती सामाजिक असोत किंवा आर्थिक असोत. यासह पालकांच्या दुर्लक्षाचा परिणाम, प्रियजनांची उपेक्षा, प्रतिकूल परिस्थिती, गरिबी, समृद्धीचा अभाव किंवा लोभ, हीदेखील कारणे यामागे असू शकतात. तत्काळ खटला चालवणे, हा गुन्हेगाराचा मूलभूत अधिकार आहे. गुन्हा गंभीर असल्याच्या कारणावरून यंत्रणा त्याच्या जामीन अर्जाला विरोध करू शकत नाही. या प्रकरणात हे उल्लंघन झाले आहे, ज्यामुळे घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन होते.

संपादकीय भूमिका

गुन्हेगार निर्माण होणारी समाजव्यवस्था चांगली करण्याचे दायित्व समाजाचेच असून त्याने ते पार पाडण्याची आवश्यकता आहे !