गोवंश तस्कर किरण चव्हाण यांना सीमापार करा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे मागणी

सातारा, ४ जुलै (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी महाबळेश्वर तालुक्यात गोवंश तस्करी रोखण्याचे मोठे कार्य केले आहे. तरीही महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातून गत काही वर्षांपासून अनधिकृतपणे गोवंश तस्करी चालूच आहे. ही तस्करी करणार्‍या किरण चव्हाण यांना महाबळेश्वर तालुक्यातून सीमापार करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक) निवेदनामध्ये म्हटले आहे की, शासनाने गत काही वर्षांपासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे; मात्र या कायद्यानुसार कठोर कारवाई केली जात नाही. या कायद्याचे उल्लंघन करून किरण चव्हाण ही व्यक्ती महाबळेश्वर तालुक्यातून गोवंशाची अनधिकृतपणे तस्करी करत आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना महाबळेश्वर तालुक्यातून सीमापार करण्यात यावे.