Cultural Marxism : संस्कृतीवरील आक्रमकांचे मुखवटे ओळखून त्यांच्या विरोधात लढले पाहिजे ! – अभिजीत जोग

वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून) : उद्बोधन सत्र – हिंदु राष्ट्रासाठी वैचारिक आंदोलन

श्री. अभिजीत जोग

विद्याधिराज सभागृह : स्वातंत्र्यानंतर इतिहास आणि शिक्षण यांवर साम्यवाद्यांचे   प्रभुत्व राहिले आहे. भारताचे तुकडे करणे, हे साम्यवाद्यांचे धोरण राहिले आहे. त्यांनी भारताचे तुकडे करण्यासाठी इतिहास आणि शिक्षण यांची मोडतोड केली. वर्ष २०१४ मध्ये हे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी हिंदु संस्कृतीला लक्ष्य करणे चालू केले. धर्मसंस्था, राष्ट्रवाद आणि शिक्षणव्यवस्था हे संस्कृतीचा आधार आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपली संस्कृती नष्ट झाली, तर आपले अस्तित्व संपून जाईल. त्यामुळे हे आक्रमण समजून घेतले पाहिजे. यासाठी त्यांचे मुखवटे समजून घेऊन त्यांच्या विरोधात लढले पाहिजे. शेवटी विजय आपलाच होणार आहे, असे प्रतिपादन ‘प्रतिसाद’ कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत जोग यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चौथ्या म्हणजे २७ जून या दिवशी केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करण्यासाठी त्यांनी येथील संस्कृती नष्ट करून भारतियांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान घालवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी शिक्षण आणि इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पूर्वीपासून चालू असलेले गुरुकुल बंद केले आणि इंग्रजी शिक्षण व्यवस्था चालू केली. त्यामुळे भारतातील बहुतांश लोक निरक्षर बनले. यासमवेत त्यांनी भारताच्या मूळ इतिहासात खोट्या गोष्टी घुसडल्या, तसेच भारतात पूर्वी मनुष्याच्या कर्मावर आधारित असलेल्या वर्णव्यवस्थेला त्यांनी जन्मावर आधारित म्हणजे जातीव्यवस्था असे नाव दिले. अशा प्रकारे इंग्रजांनी आपली ओळख काढून त्यांना हवी असलेली ओळख आपल्यावर थोपवली. अशा प्रकारे मेकॉले पुत्र आणि मार्क्सवादी यांनी एकत्रितपणे भारताचा आत्मसन्मान नष्ट करण्याचे प्रयत्न केला.’’