Israel Attack Rafah : राफाहवर इस्रायलचे दुसरे मोठे आक्रमण : २५ ठार, तर ५० घायाळ !

२६ मेच्‍या आक्रमणात ४५ लोक झाले होते ठार !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायली संरक्षण दलांनी २१ जूनला गाझाच्‍या दक्षिणेला असलेल्‍या राफाह शहरावर आक्रमण केले. यांतर्गत शहराबाहेर ‘अल्-मवासी’ येथील पॅलेस्‍टिनी लोकांच्‍या निर्वासित छावण्‍यांवर बाँबस्‍फोट करण्‍यात आले. यात २५ जण ठार, तर ५० जण घायाळ झाले. पॅलेस्‍टाईनच्‍या आरोग्‍य मंत्रालयाने या आक्रमणाची माहिती दिली; परंतु इस्रायल संरक्षण दलाकडून आक्रमण केल्‍याचे कोणतेही संकेत देण्‍यात आलेले नाहीत. आतंकवादी लोकवस्‍त्‍यांमधून आतंकवादी कारवाया करतात’, असे इस्रायल नेहमीच सांगत आला आहे.

इस्रायल आणि हमास यांच्‍यातील युद्धामुळे लाखो लोक या भागातून आधीच पळून गेले आहेत. याआधी २६ मे या दिवशीही इस्रायलने राफाह शरणार्थी छावणीवर हवाई आक्रमण केले होते. यामध्‍ये ४५ जणांचा मृत्‍यू झाला होता, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले होते. यानंतर इस्रायलद्वेष्‍ट्यांकडून ‘#AllEyesOnRafah’ (जगाचे लक्ष राफाहवर) हा हॅशटॅग वापरून इस्रायलला लक्ष्य करण्‍यात आले. याला भारतातील पुरो(अधो) गामी जमातीनेही उचलून धरले होते.

युद्धात आतापर्यंत ३७ सहस्र लोकांचा मृत्‍यू !

इस्रायल आणि हमास यांच्‍यातील युद्ध ७ ऑक्‍टोबर २०२३ पासून चालू आहे. हमासच्‍या आतंकवाद्यांनी १ सहस्र २०० इस्रायली नागरिकांना ठार मारून २३४ जणांचे अपहरण केले होते. त्‍यानंतर झालेल्‍या युद्धात आतापर्यंत ३७ सहस्र १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.