China Peddles Pro-Khalistani Propaganda : चीनकडून जगभरातील शिखांच्या विरोधात सामाजिक माध्यमांद्वारे अपप्रचार !

  • ‘मेटा’ आस्थापनाचा अहवाल !

  • भारतावर टीका करण्याचा प्रयत्न

नवी देहली – चीन जगभरात शिखांच्या विरोधात अपप्रचार करत असल्याचे समोर आले आहे. सामाजिक माध्यमातून चीन शिखांना अपकीर्त करण्यासाठी आणि त्यांना भडकावण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे अन् अपप्रचार करत आहे. या प्रचारात चीनने भारत, अमेरिका, कॅनडासह जगभरातील शीख समुदायाच्या लोकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे, अशी माहिती फेसबुक आणि इन्स्टाग्राम या माध्यमांचे मूळ आस्थापन ‘मेटा’ने दिली आहे.

हिंदी आणि इंग्रजी खात्यांद्वारे करत आहे अपप्रचार !


चीन फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स या माध्यमांवर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये द्वेषयुक्त खाती चालवत आहे. ज्याद्वारे तो शिखांना भडकावण्याचा आणि त्यांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये पंजाबसह जगभरातील शीख समुदाय, खलिस्तानसाठीची चळवळ, कॅनडातील खलिस्तानी हरदीपसिंह निज्जर याची हत्या आणि भारत सरकारवर टीका आदींशी संबंधित पोस्टचा समावेश होता.

फेसबुकने बंद केली खाती !

फेसबुकने या चिनी खात्यांटवर अंकुश ठेवण्यास आरंभ केला आहे. फेसबुकवरून चीनमधून चालणारी अशी ३७ खाती आणि १३ पेजेस काढून टाकण्यात आली आहेत.

चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त षड्यंत्र !

चीन शिखांना भडकावण्यासाठी राबवत आहे मोहिमा

आतापर्यंत सामाजिक माध्यमांवरील पाकिस्तानी खात्यांवरून अशा प्रकारे शिखांना लक्ष्य करून भारताच्या विरोधात मोहीम चालवण्यात येत होती. आता चीनकडून हा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. चीन आणि पाकिस्तान यांचे हे संयुक्त षड्यंत्र असू शकते, अशी शक्यता भारतीय सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे.

संपादकीय भूमिका

डावपेचात हुशार असणारा चीन ! भारतानेही आता ‘जशास तसे’ धोरण अवलंबून प्रत्युत्तर देणे आवश्यक !