पनवेल येथील ‘इंटरनेट’ या महिला वेटर असणार्‍या बारवर धाड !

पनवेल – खांदेश्वर पोलिसांनी ३० मे या दिवशी आसूडगाव येथील ‘इंटरनेट’ या ‘लेडीज सर्व्हिस’ बारवर मध्यरात्री सवा वाजता धाड घातली. रायगड जिल्हाधिकार्‍यांनी हे धारिष्ट्य दाखवले आहे, अशी चर्चा आहे. पुणे येथील पोर्शे अपघाताच्या पार्श्वभूमीवर पनवेल येथील अवैध बारवरही कारवाई होऊ लागली आहे, असे म्हटले जात आहे. या बारचे मालक, व्यवस्थापक परवान्यातील अटी पाळत नसल्याचे याअगोदर सुद्धा सिद्ध झाले आहे. पूर्वीही या बारवर धाड घालण्यात आली होती.

सर्वसंमतीने चालणार्‍या या अवैध बारमध्ये १२ महिला वेटरांना अश्लील चाळे करतांना कह्यात घेतले. पनवेलमध्येही ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवले जातात. बारच्या परवान्याखाली अनेक गैरधंदे येथे चालत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात होता. कळंबोली सर्कलच्या हाकेच्या अंतरावर रात्रभर हा बार चालू असल्याने स्थानिक रहिवासी वैतागले आहेत. आसूडगाव परिसरातील सेक्टर ४ ए येथील तपोवन इमारतीमध्ये ‘इंटरनेट’ हा बार आहे.

पनवेलमधील बारविकृती चालूच !

गेली अनेक वर्षे लेडीज बारमुळे पनवेल शहराची अपकीर्ती झाली आहे. कोन गावाजवळ अनेक लेडीज सर्व्हिस बार एकाच ठिकाणी आहेत. ते मध्यरात्रीनंतरही चालू असतात. पुण्यावरून येणारी गिर्‍हाईके पहाटेपर्यंत या बारमध्ये राहून पहाटे पुण्याला परत जात असल्याचे म्हटले जाते. या महामार्गावर मद्यपी वाहनचालक पडताळणारी यंत्रणा नाही, असेही लक्षात येते.

संपादकीय भूमिका 

  • पनवेलमध्ये ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार चालवले जातात, हे पोलिसांसह सर्वांना ठाऊक असूनही आतापर्यंत प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई का केली नाही ? यामागे असणारा भ्रष्टाचार कधीच चव्हाट्यावर येणार नाही का ?
  • पोलिसांच्या भ्रष्टाचाराप्रमाणेच या गोष्टी ठाऊक असूनही हे लेडीज बार नियम तोडून मोठ्या प्रमाणात चालू असणे अशक्य आहे, असेच सर्वांना वाटते.
  • असे अवैध धंदे वर्षानुवर्षे चालू देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांनाच या संदर्भात शिक्षा व्हायला हवी !