WB Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथे आदिनाथ मंदिर पाडून बांधण्यात आली आहे आदिना मशीद !

  • मशीद परिसरात अद्याप हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि खंडित शिवलिंग

  • परिसरात पूजा करणार्‍या हिंदु पुजार्‍यांवर पुरातत्व विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद !

मालदा (बंगाल) – येथील ‘आदिना’ मशीद परिसरात १७ फेब्रुवारी या दिवशी वृंदावन येथील विश्‍वविद्या ट्रस्टचे प्रमुख असणारे हिरण्यमय गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी पूजा केली. याला स्थानिक मुसलमानांनी विरोध केला. या प्रकरणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने हिरण्यमय गोस्वामी यांच्या विरोधात मालदा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही मशीद हिंदूंचे मंदिर पाडून काही शतकांपूर्वी बांधण्यात आली आहे. येथे अद्यापही हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि खंडित शिवलिंग आहे.

१. हिरण्यमय गोस्वामी या परिसराला भेट देण्यासाठी आले होते. त्याने येथे शिवलिंग आणि देवतांच्या मूर्तीही पाहिल्या. यानंतर त्यांनी त्यांच्या काही मित्रांना बोलावले आणि पूजा अन् मंत्रपठण चालू केले. यामुळे परिसरातील मुसलमानांना त्रास झाला. त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

२. गोस्वामी यांना रोखण्यासाठी उपनिरीक्षक नवीनचंद्र पोद्दार येथे पोचले. पोद्दार यांनी गोस्वामी यांना या मशिदीत धार्मिक कृती करता येत नसल्याचे सांगितले. गोस्वामी यांनी पोद्दार यांना विचारले, ‘माझा गुन्हा काय आहे?’ त्यावर पोद्दार म्हणाले, ‘तुमचा गुन्हा हा आहे की, तुम्ही तुम्हाला हवे तिथे नमस्कार करत आहात. येथे तुम्ही अशी कृती करू शकत नाही.’ या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला.

३. गोस्वामी यांनी पोलीस अधिकारी पोद्दार यांना विचारले, ‘मला येथे मूर्ती दिसत आहेत, तर पूजा का करू शकत नाही ? ‘येथे नमस्कार करू शकत नाही’ असे कुठे लिहिले आहे का, ते मला दाखवा. मला येथून जाण्यास सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?’ यानंतर हिंदूंनी त्यांना येथे येण्यास मनाई असल्याचा लेखी आदेश दाखवण्याची मागणी केली.

आदिनाथ मंदिराचा इतिहास

इस्लामी आक्रमणकर्ता सुलतान सिकंदर शाह याने वर्ष १३६९ मध्ये हिंदु मंदिर पाडून येथे मशीद बांधली होती. मे २०२२ मध्ये भाजप नेते रतींद्र बोस यांनी या मशिदीच्या खाली ‘आदिनाथ मंदिर आहे’, असे सांगितले होते. त्यांनी ट्वीट करून म्हटले होते, ‘मुसलमान आणि ब्रिटीश शासकांपासून या मंदिराचे रक्षण करतांना जितू सरदार यांना वीरमरण आले. हा इतिहास कुणाला ठाऊक नाही. स्थानिक आमदार चिन्मय देब बर्मन यांच्यासमवेत मी येथे फिरलो, तेव्हा ही गोष्ट माझ्या ध्यानात आली. काशीचे भगवान विश्‍वनाथ त्यांच्या ठिकाणी परतले आहेत. आता भगवान आदिनाथांना संधी आहे का ?’

संपादकीय भूमिका 

  • देशातील हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या पुन्हा हिंदूंना मिळण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कायदा करणे आवश्यक झाले आहे !
  • पुरातत्व विभागाच्या कह्यात असणार्‍या प्राचीन मंदिरांमध्ये हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळण्यासाठी केंद्र सरकारने आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !