सिंधुदुर्ग – आताच्या कलियुगात स्वतःच्या कुलदेवतेचा, तसेच श्री दत्तगुरूंचा नामजप, म्हणजेच साधना केल्यास जीवनातील दुःखांचे निवारण होऊ शकते. यामुळे व्यक्ती आनंदाने जीवन जगू शकते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर सद्गुरु स्वाती खाडये यांनी कणकवली तालुक्यातील असलदे, सावंतवाडी तालुक्यातील माडखोल आणि विलवडे, देवगड तालुक्यातील आरे या ठिकाणी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले, तसेच या वेळी त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमांना सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या सर्व मार्गदर्शनाचा लाभ ३५० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.
या वेळी मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘भारतीय अध्यात्मशास्त्र अत्यंत प्रगल्भ आहे; मात्र दुर्दैवाने आताच्या हिंदूंचा त्याविषयीचा अभ्यास नसल्याने त्यांना ‘उपवास का करावा ? देवतेला योग्य पद्धतीने नमस्कार कसा करावा ?’, आदी छोट्या छोट्या धार्मिक कृतींविषयीही माहिती नाही. ते स्वत:च्याच मनाने साधना करत आहेत. त्यामुळे आपल्या जीवनातील संकटे, दु:ख न्यून होत नाही. समाजही धर्मपालन करत नसल्याने तो अधोगतीला गेला आहे.’’