अहिल्यानगर – संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असतांना २ जानेवारीला काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाल्याची घटना घडली आहे. १० ते १२ जणांनी आक्रमण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हे आक्रमण झाले आहे. या आक्रमणात सचिन चौगुले आणि त्यांच्यासह असलेले सुरेश आरणे हे दोघे घायाळ झाले आहेत. आक्रमणानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
पदाधिकार्यांवरील आक्रमणानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पोलिसांनी निःपक्षपातीपणे कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.