छत्रपती संभाजीनगर – वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणार्या ‘सनशाईन एंटरप्राईज कारखान्या’त लागलेल्या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर ४ कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला आहे. ही घटना ३० डिसेंबरच्या मध्यरात्री घडली आहे. त्या वेळी कामगार झोपेत होते. आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून मृत कामगारांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.
हँडग्लोज बनवणार्या कारखान्यात अनुमाने २० ते २५ कामगार काम करतात. १० कामगार कारखान्यात रहातात. सर्व कामगार झोपेत असतांना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. कारखान्यातून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणे कठीण होते. काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने स्वतःची सुटका केली. ४ घंट्यांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.