दोन सेवानिवृत्त आणि एक शिक्षणाधिकारी अशा तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा नोंद  !

कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती आढळल्याचे प्रकरण !

पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे आणि विष्णु कांबळे, तसेच सोलापूर येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या विरोधात कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती आढळल्याच्या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद केला आहे. किरण लोहार यांच्या समवेत त्यांची पत्नी सौ. सुजाता किरण लोहार (वय ४४ वर्षे) आणि मुलगा निखिल (वय २५ वर्षे) यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (शिक्षण विभाग हा सर्व क्षेत्रांत पवित्र समजला जातो, तसेच तिथे विद्यार्थी घडवण्याचे कार्य चालते ! अशा ठिकाणी भ्रष्ट अधिकारी असतील, तर ते विद्यार्थ्यांवर संस्कार काय करणार ? सेवानिवृत्त झाल्यावर गुन्हा होण्यापेक्षा त्यांच्या प्रत्यक्ष कार्यकाळात गुन्हा का नोंद झाला नाही ?, तसेच यांना आता जरी अटक झाली, तरी अशांवर जलद आणि कठोर कारवाई झाल्यासच अन्यांवर वचक बसेल ! – संपादक)

१. तुकाराम सुपे हे पुणे येथे माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते, तर विष्णु कांबळे हे सांगली येथील माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत होते. विष्णु कांबळे आणि त्यांची पत्नी सौ. जयश्री कांबळे यांच्यावर ८२ लाख ९९ सहस्र ९५२ रुपयांच्या बेहिशोबी संपत्तीच्या प्रकरणी सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात, तर तुकाराम सुपे यांच्यावर ३ कोटी ५९  लाख रुपयांच्या संपत्ती जमल्याच्या प्रकरणी सांगवी (पुणे) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२. सोलापूर येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे ५ कोटी ८५ लाख ८५ सहस्र ६२३ रुपये बेहिशोबी संपत्ती आढळल्याच्या प्रकरणी सोलापूर येथील सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.