सनातन धर्माला संपवण्‍याविषयी ‘हेट स्‍पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेत श्री. रमेश शिंदे (डावीकडे) आणि बाजूला प्राचार्य डॉ. अजित चौधरी

बीड, १३ ऑक्‍टोबर (वार्ता.) – भारतात राज्‍यघटना आणि कायदा अस्‍तित्‍वात असतांनाही उदयनिधी स्‍टॅलीन, प्रियांक खर्गे यांच्‍यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्‍यू, मलेरिया, एच्.आय.व्‍ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्‍याची अतिरेकी आणि अर्बन नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत. त्‍याही पुढे जाऊन महाराष्‍ट्रात निखिल वागळे यांच्‍यासारखे स्‍वतःला पुरोगामी म्‍हणवणारे पत्रकार, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्‍हाड हेही सनातन धर्म संपवण्‍याच्‍या भूमिकेला पाठिंबा घोषित करून ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे’, अशा प्रकारची विषारी टीका करत आहेत. अशा प्रकारे ‘हेट स्‍पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? असे वक्‍तव्‍य हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. बीड शहरातील नगर रोड, शासकीय विश्रामगृह येथे १३ ऑक्‍टोबरला झालेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. अजित चौधरीही उपस्‍थित होते.

श्री. रमेश शिंदे पुढे म्‍हणाले की, दुसरीकडे सर्वोच्‍च न्‍यायालयाने २८ एप्रिल २०२३ या दिवशी दिलेल्‍या आदेशात स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, जर कुणी ‘हेट स्‍पीच’ करून कोणत्‍याही समाजाच्‍या भावना दुखावण्‍याचा प्रयत्न करेल, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्‍वतःच नोंद घेऊन प्रथम दर्शनी अहवाल (FIR) प्रविष्‍ट केला पाहिजे. यात सरकारने विलंब केल्‍यास त्‍याला मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा अवमान मानले जाईल. इतका स्‍पष्‍ट आदेश असतांनाही या १०० कोटी समाज असणार्‍या सनातन धर्माच्‍या विरोधात वक्‍तव्‍य करणार्‍यांवर अद्याप गुन्‍हा नोंद का झालेला नाही ? त्‍यामुळे सनातन धर्माच्‍या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्‍ट करण्‍याविषयी ‘हेट स्‍पीच’ करणार्‍यांच्‍या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्‍यात येणार आहे. या अंतर्गत सनातन धर्मियांत जागृती करणारी व्‍याख्‍याने-बैठका घेणे, तसेच ‘हेट स्‍पीच’ करणार्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करणे, अशा प्रकारच्‍या कृती केल्‍या जाणार आहेत’.