अहिल्यानगर – तमिळनाडूतील द्रवीड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमूलक विधान केले. त्यांचे वक्तव्य हे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘हेट स्पीच’ होते. तरीही महाराष्ट्रातील पत्रकार निखिल वागळे यांनी उदयनिधी स्टॅलिनच्या मताशी सहमत असल्याची पोस्ट फेसबुकद्वारे केली. हा एकप्रकारे सनातन धर्माचा अपमान आहे. धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या मनामध्ये धार्मिक समुहाचा वंशविच्छेद हेच ध्येय आहे. यासाठी महाराष्ट्रातील सनातनधर्मीय हिंदु समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील यश पॅलेस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या परिषदेला जगदंबा मंदिर प्रमुख अधिवक्ता अभिषेक भगत, विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे श्री. योगेश सोनवणे, सुनील डहाळे, हिंदु जनजागृती समितीच्या नगरजिल्हा समन्वयक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी संबोधित केले.
जिल्ह्यात ३ तालुक्यांत तक्रारी प्रविष्ट करणार ! – कु. प्रतीक्षा कोरगांवकर, हिंदु जनजागृती समिती
सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर ‘सनातन धर्मरक्षण’ अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जागृतीसमवेत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे. नगर जिल्ह्यात नगर शहरासह नेवासा, श्रीरामपूर या तालुक्यांत सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्यांच्या विरोधार तक्रारी प्रविष्ट करण्यात येणार आहेत. |