खडकवासला (जिल्हा पुणे) – येथील तोरणागडाच्या बिन्नी दरवाजाच्या मार्गाने गडावर पर्यटकांची वर्दळ असते. एका बाजूला खोल दर्या आहेत. निसरड्या कातर खडकातून पर्यटकांना चढउतार करावी लागत आहे. तोरणागडाच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय केला जात असतांना पर्यटकांच्या सुरक्षेकडे मात्र पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले होते. उंच कड्यात संरक्षक कठडे (रेलिंग) नसल्याने पर्यटकांना अक्षरशः जीव मुठीत धरून चढउतार करावी लागत आहे. काही ठिकाणी दोरखंड लावले आहेत. त्यांच्या आधाराने पर्यटकांना चढाई करावी लागत आहे. (राज्यात पुरातत्व विभाग सक्षमपणे कार्यरत नसल्याचे हे उदाहरण आहे. गडांचे जतन आणि संवर्धन करणे, हे पुरातत्व विभागाचे कार्य आहे. असे असतांना त्याची ध्येयपूर्तीच होत नसेल, तर हा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ? – संपादक) ; मात्र आता पुरातत्व विभागाला जाग आली असून २३ मे या दिवशी पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे यांच्या देखरेखीखाली ‘रेलिंग’ बसवण्यात येत आहे. रेलिंगसाठी सळई, बांधकाम साहित्य आणले असून १५ कामगार आणि ५ तांत्रिक कारागीर काम करत आहेत. पुरातत्व विभागाचे पहारेकरी सुरक्षारक्षक आदी गडावर तळ देऊन आहेत.
डॉ. विलास वाहणे यांनी सांगितले की, खडकात खोल खड्डे घेऊन सिमेंट काँक्रीटमध्ये रेलिंग बसवण्यात येत आहेत. पावसाळ्यापूर्वी बिन्नी दरवाजा मार्गावरील ‘रेलिंग’ बसवण्याचे काम पूर्ण होणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.