भाट्ये (रत्नागिरी) येथे वाळूशिल्पातून वीर सावरकरांना अभिवादन !

‘सावरकर विचार जागरण सप्ताह’

भाट्ये किनार्‍यावर मूर्तीकार अमित पेडणेकर यांनी काढलेले वाळूशिल्प.

रत्नागिरी, २७ मे (वार्ता.) – भाट्ये येथे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर यांचे देखणे वाळूशिल्प येथील मूर्तीकार अमित पेडणेकर यांनी साकारले आहे. हे शिल्प पहाण्याकरता भाट्ये समुद्रकिनार्‍यावर शेकडो लोकांनी गर्दी केली. भाट्ये गावच्या सरपंच सौ. प्रीती भाटकर यांनी फीत कापून आणि सागरी सीमा मंचाचे प्रांत सहसंयोजक संतोष सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून या वाळूशिल्पाचे उद्घाटन केले.
महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतित पावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २१ मे पासून सावरकर विचार जागरण सप्ताह चालू आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी, भगूर, नाशिक, मुंबई, पुणे आणि सांगली येथे या सप्ताहानिमित्त सावरकरांचा विचार पोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

वाळूशिल्पाचे उद्घाटन २७ मे या दिवशी सायंकाळी करण्यात आले. या वाळूशिल्पामध्ये वीर सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर, पतित पावन मंदिर आणि मोरया बोट साकारण्यात आली आहे. हे वाळूशिल्प सुरेख साकारल्याबद्दल अनेकांनी मूर्तीकार अमित पेडणेकर यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.

वाळू शिल्प उद्घाटनप्रसंगी पतित पावन मंदिर संस्थेचे अधिवक्ता बाबासाहेब परूळेकर, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे विश्वस्त अधिवक्ता विनय आंबुलकर, अधिवक्त्या शाल्मली आंबुलकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य इब्राहिम वाडकर, सुमेधा भाटकर, पराग भाटकर, रमीजा भाटकर, ग्रामसेवक पाचवे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.