गोव्यात जुलै मासात ऊर्जाविषयक २ महत्त्वाच्या बैठका होणार

पणजी, २६ मे (वार्ता.) – गोव्यात जुलै मासात १४ वी क्लीन एनर्जी मिनिस्ट्रियल (सी.ई.एम्.) आणि ८ वी मिशन इनोव्हेशन या ऊर्जाविषयक २ महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. देहली येथे १४ व्या हरित ऊर्जा मंत्रालयाचा लोगो (चिन्ह) प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय ऊर्जामंत्री आर्.के. सिंह यांनी ही माहिती दिली.

गोव्यात १४ वी सी.ई.एम्. बैठक १९ ते २२ जुलै या कालावधीत होणार आहे. हरित ऊर्जेचा विकास आणि वापर यांना गती देण्याच्या उद्देशाने या बैठकीत मंथन केले जाणार आहे. या बैठकीतून राज्ये आणि केंद्र सरकार यांच्यासह या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना, खासगी क्षेत्रातील तज्ञ, शिक्षणतज्ञ, व्यावसायिक, धोरण बनवणारे आदी एकाच व्यासपिठावर येणार आहेत. हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी वर्ष २००९ मध्ये क्लीन एनर्जी मिनिस्ट्रियल(सी.ई.एम्.) या उच्चस्तरीय जागतिक मंचाची स्थापना झाली.

भारत हा सी.ई.एम्.चा संस्थापक सदस्य आहे. सी.ई.एम्.चे सचिवालय फ्रान्समध्ये पॅरिस येथे आहे. या वेळी केंद्रीय मंत्री आर्.के. सिंह म्हणाले, सी.ई.एम्. हा मंच जागतिक स्तरावर स्वच्छ ऊर्जा समुदायाला एकत्र आणतो. स्वच्छ ऊर्जेविषयी नावीन्यता जाणून घेण्याची संधी या निमित्ताने मिळत असते.