तोरणागडाच्या (पुणे) तटबंदीखाली ३ शिवकालीन गुहा सापडल्या !

तोरणा किल्ल्याच्या तटबंदीखाली सापडलेल्या गुहा

पुणे – वेल्हे तालुक्यातील तोरणागडाच्या तटबंदी खाली मेटपिलावरे मार्गांकडून बुधला माचीकडे आडबाजूला ३ शिवकालीन गुहा उजेडात आल्या आहेत. गड-दुर्ग प्रेमींसाठी हा कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय असल्याने तोरणागडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. या गडावर तोफेचे गोळे, शिवकालीन नाणी किंवा गुप्त भुयारी मार्ग हे अनेक वेळा सापडले आहेत. या गडाच्या मेटपिलावरे मार्गावरील श्री कुंबळजाई मंदिर मार्गे अडगळीच्या झाडाझुडपांतून पढेर दांडावर जातांना स्थानिक नागरिकांना या गुहा दिसल्या. त्यांनी गुहेच्या तोंडाशी असलेली झुडपे आणि माती काढून पाहिले असता आत प्रशस्त आकाराची गुहा आढळली, अशी माहिती माजी सरपंच हनुमंत पिलावरे यांनी दिली. यातील एका गुहेत बसण्यासाठी दगडी आसन व्यवस्था, मध्यभागी चौक आहे, तर इतर दोन गुहांमध्ये जातांना गुडघ्यावर वाकत जावे लागत आहे. गुहेच्या आतील अंतराचा अंदाज येत नसून आत गेल्यास जीव गुदमरला जात आहे. तरी पर्यटकांनी अतीउत्साहाने गुहेमध्ये जाऊ नये.