इयत्ता १ ली ते १० वीच्या अभ्यासक्रमात आता ‘कृषी’ विषयाचा समावेश !

मुंबई – इयत्ता १ ली ते १० वीच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीचा अभ्यासक्रम लवकरच निश्‍चित करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, ‘‘याविषयीचा प्राथमिक अहवाल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तज्ञांची समिती नियुक्त करून याविषयीचा आराखडा निश्‍चित केला जाणार आहे. यामुळे शेतीचे अध्ययन होईल. विद्यार्थ्यांचा कृषीकडे ओढा वाढेल, तसेच त्यांच्यामध्ये शेती आणि शेतकरी यांच्याविषयी संवेदनशीलता निर्माण होईल. शालेय जीवनापासून शेतीविषयक ज्ञान मिळाल्यास पुढील जीवनात विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरेल. इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते ८ वी आणि ९ वी ते १० वी अशा टप्प्याने हा अभ्यासक्रम  सिद्ध करण्यात येणार आहे.’’

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांतील तज्ञांची समिती नियुक्त करून याविषयीचा अभ्यासक्रम सिद्ध करावा, अशी सूचना प्रशासनाला दिली.