(म्हणे) ‘धर्म आणि राष्ट्रीयता यांमुळे देशाची हानी !’ – भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक

ठाणे, २८ मार्च (वार्ता.) –  जगात सगळ्यात खराब गोष्ट काही असेल, तर ती धर्म आणि राष्ट्रीयता हीच आहे. मी पाकिस्तान आणि चीन येथेही गेलो आहे. तिथेही आपल्यासारखेच लोक आहेत. पाकिस्तानात कडेवर एक मूल घेऊन जाणारी स्त्री मी पाहिली. चीनमध्येही महिलांना आपल्या महिला परिधान करत असलेल्या साडीचे अप्रूप असते.  सगळी चांगली लोक आहेत.  सरकारे वाईट असतात. राष्ट्र वाईट असते. तेच आपल्यात झुंजी लावून भानगडी करत रहातात. धर्म आणि राष्ट्रीयता या २ गोष्टींमुळेच देशाचे सर्वाधिक हानी झाली आहे. धर्म आणि राष्ट्रीयता अजिबात मानायच्या नाहीत. लेखकांनी त्याच्या पलीकडे जाऊन लिहले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी ठाणे येथे व्यक्त केले.

सौजन्य : लोकमत न्युज

साहित्य विश्‍वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळा नुकताच ठाणे येथे पार पडला. त्या वेळी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत भालचंद्र नेमाडे यांनी त्यांचे हे मत व्यक्त केले.

नेमाडे पुढे बोलतांना म्हणाले की, ‘‘माणूस अजूनही ‘हंटर’ वृत्तीचा म्हणजे शिकारीच्या काळात जसा होता तसाच आहे. आजही दर २-३ मिनिटांनी बलात्कार होतात. खून होतात आणि १५ वर्षे आरोपी सापडत नाहीत. ‘अच्छे दिन’ यालाच म्हणतात. अशा वेळी लेखकांचे काम असते की, सर्वांना चांगल बोलणे किंवा वरवरचे वागू नये. परखडपणे मत मांडावे.’’

संपादकीय भूमिका

नेमाडे यांना धर्म आणि राष्ट्रीयता यांची ‘अ‍ॅलर्जी’ असेल, तर ज्या देशात या दोन गोष्टी नाहीत, त्या देशात त्यांनी खुशाल निघून जावे. भारत सोडून जगातील प्रत्येक राष्ट्राने त्याचा धर्म घोषित केला आहे, हे नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांना माहीत नाही, हे आश्‍चर्य आहे !