साधकांनो, ‘योग्‍य विचारप्रकियेसह परिपूर्ण कृती करणे’, हे साधनेचे समीकरण असल्‍याने त्‍याप्रमाणे प्रयत्न करून साधनेतील निखळ आनंद अनुभवा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘प्रत्‍येक व्‍यक्‍तीवर अनेक जन्‍मांचे संस्‍कार असतात आणि त्‍यानुसार तिची विचारप्रक्रिया अन् वर्तन होत असते. काही साधकांच्‍या मनामध्‍ये साधनेची तळमळ असते; परंतु स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे कृतीत चुका राहिल्‍याने कृती अयोग्‍य होते. बर्‍याच साधकांकडून एखादी कृती बाह्यतः परिपूर्ण आणि तत्‍परतेने होते; परंतु ती करतांना त्‍यांच्‍या मनात ‘मी चांगली कृती करतो. मला इतरांपेक्षा अधिक चांगले जमते’, असे अहंयुक्‍त विचार असतात. त्‍यामुळे कृती पूर्ण झाली, तरी विचार अयोग्‍य असल्‍याने सेवा ईश्‍वरचरणी अर्पण होत नाही.

काही साधकांची ‘मी किती सेवा करतो !’, ‘सेवेचे दायित्‍व मला मिळावे’, ‘मी एखादी सेवा चांगल्‍या प्रकारे करू शकतो’, अशी अहंयुक्‍त विचारप्रक्रिया असते. अशा अहंयुक्‍त विचारांमुळे त्‍यांनी केलेल्‍या कृतीत अनेक चुका राहून साधनेत त्‍यांची वेगाने घसरण होते. सेवा करतांना योग्‍य कर्म करण्‍यासह ईश्‍वराप्रती भाव असेल, तसेच मन शुद्ध असेल, तर साधना होऊन तन आणि मन ईश्‍वरचरणी अर्पित होते. त्‍यासाठी ‘स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया नियमितपणे राबवणे, दिवसभरात वेळोवेळी मनाचा आढावा घेणे, साधनेच्‍या संदर्भात उत्तरदायी साधकांकडून दिशा घेऊन मन आणि कृती यांच्‍या स्‍तरावर प्रयत्न करणे’, असे प्रयत्न केल्‍यास विचार आणि कृती अशा दोन्‍ही स्‍तरांवर योग्‍य प्रक्रिया होऊन साधनेतील निखळ आनंद अनुभवता येईल.

साधकांनो, ‘आपली प्रत्‍येक कृती आणि त्‍यामागील विचार यांकडे भगवंताचे लक्ष आहे’, हे ध्‍यानी ठेवून प्रामाणिकपणाने साधना करा !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२३)