१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला सर्वकाही शिकून घेण्यास सांगणे आणि गुरुदेवांना प्रत्येक साधक, व्यक्ती अन् प्रसंग यांतून शिकणे अपेक्षित असल्याचे सहसाधिकेने सांगणे
‘एकदा मला परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्या वेळी ते मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘तुला सर्वकाही शिकायचे आहे. त्यानुसार प्रयत्न कर.’’
जेव्हा गुरुदेवांनी मला ‘तुला सर्व शिकायचे आहे’, असे सांगितले, तेव्हा माझा विचार केवळ ‘सेवा आणि दायित्व घेणे’, या दृष्टीने झाला होता; पण जेव्हा मी हा विचार सहसाधिकेला सहज सांगितला, तेव्हा तिने मला त्याचा भावार्थ विस्ताराने सांगितला. ती म्हणाली, ‘‘तुला सर्व शिकायचे आहे, म्हणजे तुला प्रत्येक साधकाकडून, व्यक्तीकडून, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीतून आणि प्रत्येक क्षणी शिकायचे आहे.’’ तिने सांगितलेल्या भावार्थावर चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘गुरुदेव तर मला त्यांनी सांगायच्या आधीपासूनच शिकवत आहेत. त्याविषयी माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
२. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येण्यासाठी सेवा करण्यापूर्वी गुरुदेवांना नकळत प्रार्थना होणे
सेवा करण्यापूर्वी माझ्याकडून पुढील प्रार्थना आपोआप होते, ‘हे गुरुदेवा, मला शिकण्याच्या स्थितीत ठेवा. ‘प्रत्येक प्रसंगातून तुम्हाला मला काय शिकवायचे आहे ?’, ते मला शिकता येऊ दे.’ काही वेळाने माझे चिंतन झाल्यावर मला जाणवले, ‘माझ्याकडून तशा प्रार्थना नकळत होत आहेत.’
३. अपेक्षा सोडल्यावर पोळ्यांचे पीठ मळण्याची सेवा मिळणे आणि ती शिकायला मिळाल्याने आनंद होणे
मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात अन्नपूर्णाकक्षात पोळ्या करण्याची सेवा करायचे. ‘मलाही पीठ मळायला शिकायचे आहे’, असा विचार माझ्या मनात काही दिवस येत होता. याविषयी मी दायित्व असलेल्या साधिकेला सांगितले; पण मी लहान असल्याने ती म्हणाली, ‘‘आपण विचारून बघूया.’’ त्यानंतर मी तो विचार सोडून दिला. एकदा सहसाधिका उशिरा आल्यामुळे दायित्व असलेल्या साधिकेकडे अतिरिक्त सेवा आली. त्या साधिकेने पू. रेखाताईंना सांगितले. पू. ताईंनी लगेच सांगितले, ‘‘आता आपण तीर्थाला पीठ मळण्यास शिकवूया.’’ ते ऐकून मला पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली. या प्रसंगातून मला शिकायला मिळाले, ‘मी त्याविषयीची अपेक्षा सोडली आणि मला जे हवे होते, ते गुरुदेवांनी दिले.’
– कु. तीर्था संजय देवघरे (वय १८ वर्षे), कळवा, ठाणे. (१९.१०.२०२१)
|