आदित्‍य ठाकरे यांच्‍या वाहनावर दगडफेक नाही ! – पोलीस

संभाजीनगर – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या जिल्‍ह्यातील महालगावातील कार्यक्रमात गोंधळ उडाला असल्‍याची घटना समोर आल्‍याने राजकीय वातावरण तापले आहे. आदित्‍य ठाकरे यांच्‍या वाहनावर दगडफेक करण्‍यात आली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी केला होता; मात्र हे सर्व आरोप संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. ‘आदित्‍य ठाकरे यांच्‍या वाहनावर एकही दगड फेकण्‍यात आलेला नाही’, असा दावा ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार यांनी केला आहे.

सुनील लांजेवार म्‍हणाले की, आदित्‍य ठाकरे यांची सभा महालगाव येथे झाली. सभा संपल्‍यावर त्‍यांचा ताफा निघाला असतांना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात एक माध्‍यम प्रतिनिधी किरकोळ घायाळ झाला आहे; परंतु दगडफेक झालेली नाही, तसेच सभेत किंवा आदित्‍य ठाकरे यांच्‍या वाहनावर एकही दगड फेकण्‍यात आलेला नाही. सभेच्‍या वेळी १ दगड फेकल्‍याच्‍या आरोपात काहीही तथ्‍य नाही; कारण असे झाले असते, तर सभेत गोंधळ उडाला असता; मात्र सभा सुरळीत झाली असून आदित्‍य ठाकरे यांचे भाषण पूर्ण झाल्‍यावर सभा संपली. ‘पोलिसांकडून सुरक्षेच्‍या दृष्‍टीने त्रुटी निर्माण झाली आहे’, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. त्‍याची आम्‍ही चौकशी करू.