श्रीक्षेत्र चाफळ (सातारा) येथील वीर मारुति मंदिराचे तारेचे कुंपण कोसळण्याच्या स्थितीत !

मंदिर व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालण्याची मागणी

श्रीक्षेत्र चाफळ येथील वीर मारुति मंदिर

सातारा, २४ ऑगस्ट (वार्ता.) – १७ व्या शतकाच्या मध्यास राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांनी पाटण तालुक्यातील चाफळ येथे प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. याच वेळी समर्थांनी ११ मारुतींपैकी श्रीराम मंदिर परिसरात वीर मारुति आणि दास मारुति यांचीही प्राणप्रतिष्ठापना केली. मुख्य राममंदिराच्या मागील बाजूस असलेल्या वीर मारुति मंदिराचे तारेचे कुंपण गत काही वर्षांपासून शेवटच्या घटका मोजत आहे. कोणत्याही क्षणी हे तारेचे कुंपण कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे मंदिरालाही धोका निर्माण होऊ शकतो. ‘या गोष्टीत मंदिर व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष घालावे’, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि ग्रामस्थ करत आहेत.

वर्ष १९६७ मध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपामध्ये प्राचीन मंदिराची पडझड झाल्यामुळे मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती अरविंद सेठ मफतलाल यांनी स्वखर्चाने मंदिराचा जिर्णाेद्धार केला. मुख्य मंदिराच्या मागील बाजूस अनुमाने ७० मीटर अंतरावर दगडी तटबंदीवर वीर मारुतीचे मंदिर आहे. गत २ वर्षांपासून झालेल्या अतीवृष्टीमुळे ही तटबंदी कोसळून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. कोरोना काळात मंदिर बंद असल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सध्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेल्या वीर मारुति मंदिराला धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंत्री शंभुराज देसाई यांनी लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी !

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून पाटण तालुक्याचे नेतृत्व करणारे शंभुराज देसाई हे राज्य मंत्रीमंडळात उत्पादन शुल्क मंत्री आहेत. त्यांनी या तटबंदीच्या दुरुस्तीकामी लक्ष घालून हा ऐतिहासिक ठेवा जतन करावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि चाफळ येथील ग्रामस्थ करत आहेत.