‘आरे’मध्ये वृक्षतोडणीला विरोध करणारे पोलिसांच्या कह्यात !

मुंबई – ‘आरे’ परिसरात वृक्ष तोडण्याची कारवाई चालू झाली असून याला विरोध करणार्‍यांना पोलिसांनी नोटिसा बजावून कह्यात घेतले आहे. येथील ‘कारशेड’चे काम चालू करण्यात आल्याची चर्चा या परिसरात आहे. आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटना यांनी आंदोलन चालू केले आहे.

सध्या आरे परिसरातील मुख्य रस्त्यावरील वृक्ष तोडण्याचे काम चालू करण्यात आले आहे. या कामासाठी आरे परिसरात जाणार्‍या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त आहे. स्थानिक नागरिकांच्या व्यतिरिक्त कुणालाही या ठिकाणी ये-जा करण्यास बंदी घातली आहे. गोरेगाव ते पवई हा आरेमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ‘मेट्रो ३’च्या बोगी ‘आरे’मध्ये आणण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी वृक्ष तोडण्याचे काम चालू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.