शेवटच्या क्षणापर्यंत श्रीरामनामाचा जप करणार्‍या पौभुर्णा (जिल्हा चंद्रपूर) येथील (कै.) श्रीमती सुमती नामदेव काशेट्टीवार (वय ९३ वर्षे) !

६.७.२०२२ या दिवशी पौभुर्णा (जिल्हा चंद्रपूर) येथील श्रीमती सुमती नामदेव काशेट्टीवार (वय ९३ वर्षे) यांचे निधन झाले. २०.७.२०२२ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा १४ वा दिवस आणि उदकशांत (गंगापूजन) विधी झाला. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सौ. सारिका कृष्णा आय्या (मोठ्या मुलाची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. ‘माझी आजी श्रीमती सुमती नामदेव काशेट्टीवार प्रेमळ आणि नम्र होती. ती इतरांची आस्थेने विचारपूस करत असे.

१ आ. ती सर्वांमध्ये सहजतेने मिसळून रहात असे. ती पुष्कळ निरागस होती.

१ इ. तिने वयाच्या ९३ व्या वर्षी तिला भेटायला आलेल्या सर्व नातेवाइकांना अचूक ओळखले.

१ ई. बुद्धीमान : आजीला कोणताही हिशोब करायला वेळ लागत नसे. तेव्हा आजी ‘कुठलीही गणिती प्रक्रिया न करता हिशोब अचूक कशी सांगू शकते ?’, याचे मला आश्चर्य वाटायचे आणि आजही मला ते एक कोडेच वाटते.

१ उ. आजीची आवड-नावड पुष्कळ अल्प होती.

१ ऊ. आचारधर्माचे पालन

१ ऊ १. नातींवर आचारधर्माचे पालन करण्याचा संस्कार करणे : आजीने आम्हा नातींना शिस्त लावली होती. ‘मुलींनी कपाळावर कुंकू लावणे आणि हातात बांगड्या घालणे, अंघोळीपूर्वी वेणी घालणे, वेणी घालून झाल्यानंतर कंगवा धुणे, तसेच न्हायल्यानंतर केस कोरडे करून केसांना तेल लावून केसांची टोके बांधून मगच घराच्या बाहेर जाणे’, यांसाठी तिचा आग्रह असायचा. आधी माझ्याकडून या गोष्टी केल्या जात होत्या; पण नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतांना माझ्याकडून त्या कृती होत नव्हत्या. काही वर्षांनी मी सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करायला आरंभ केला. तेव्हा मला त्यांचे महत्त्व कळले. त्यामुळे मला आजी आणि देव यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१ ऊ २. सनातन संस्था आचारधर्मामागील शास्त्र सांगून त्याचे पालन करायला शिकवत असल्यामुळे आजीने सनातन संस्थेचे कौतुक करणे : साधनेत आल्यामुळे मला आचारधर्माचे पालन करण्याचे महत्त्व कळले. त्यामुळे मी माझ्या विवाहानंतर आजीला भेटायला जातांना साडी नेसून आणि केसांचा अंबाडा घालून जायचे. हे बघून तिला पुष्कळ आनंद व्हायचा. तिला सनातन संस्थेचे फार कौतुक वाटायचे. ती आम्हाला म्हणायची, ‘‘जुने (वयस्कर लोक) लोक उगाच काही सांगत नाहीत. त्यांचे ऐकले पाहिजे.’’

१ ए. परिस्थिती स्वीकारणे

१. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आजोबांच्या निधनानंतर ती कापसाच्या वाती करून विकत असे. तिने संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि कष्टांत काढले; परंतु याविषयी तिने कधी कोणाला दोष दिला नाही. तिने ते प्रारब्ध म्हणून स्वीकारले होते.

२. आजी माझ्या काकांकडे रहायची. जेव्हा घरात अडचण असेल, तेव्हा या वयातही ती स्वयंपाक करायची, तसेच तिला शक्य होतील, ती घरकामे करायची. ‘सवलत घेणे’ तिच्या वृत्तीतच नव्हते.

३. ५ – ६ वर्षांपूर्वी माझ्या काकांची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने ‘आजीने बाबांकडे रहावे’, असे घरातील सर्वांना वाटत होते. तेव्हा ती म्हणाली, ‘‘आता या परिस्थितीत लहान मुलाला आधाराची आवश्यकता आहे; म्हणून मी त्याच्याकडेच राहीन’’ आणि ती बाबांकडे न रहाता काकांकडेच राहिली. तेव्हा आजीने स्वतःचे वय आणि आरोग्य यांचा विचार केला नाही. तिने काकांना त्यांच्या गृहोद्योगात पुष्कळ साहाय्य केले.

१ ऐ. आजीला विविध शारीरिक व्याधींवरील मंत्रजप यायचे. त्या मंत्रजपांच्या साहाय्याने तिने पुष्कळ लोकांना आजारातून बरे केले होते.

१ ओ. राष्ट्रप्रेम : आजीने भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळचा काळ अनुभवला असल्याने ती राष्ट्राच्या त्या वेळच्या स्थितीविषयी आम्हाला सांगायची. तिच्यात असलेल्या राष्ट्रप्रेमामुळेच ती पुढे गावाची सरपंचही झाली.

१ औ. आजीने केलेली साधना

१. ३० वर्षांपूर्वी आजोबांचे निधन झाल्यानंतर आजीने तिला शक्य तेवढी कर्मकांडाच्या माध्यमातून साधना केली. ‘देवपूजा करणे’, हा तिचा नित्यनेमच होता. ती चातुर्मासात फुले, धान्य, सरकी (कापसाचे बी) यांची लक्षार्चना (टीप) देवाला वहात असे. नित्य जीवनात ती सोवळ्या-ओवळ्याचे कठोरतेने पालन करून सण आणि व्रत-वैकल्ये करत असे.

टीप – १ लाख नामजप करत देवाला फुले, धान्य इत्यादी वहाणे.

२. आजी दिवसभर ‘गुरुमंत्राचा जप (यवतमाळ येथील संत पू. सुमन महाराज यांच्याकडून घेतलेला नामजप), कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हे नामजप करायची. तिने गुरुमंत्राचा जप शेवटच्या क्षणापर्यंत केला.

३. तिने आयुष्यभर निरपेक्षपणे साधना केली.

१ अं. देवावरील श्रद्धा : आजीला ‘आता तुझे वय झाले आहे. कोणाची काळजी करू नकोस. सर्व जण सुखी आहेत. तू दिवसभर नामजप कर’, असे सांगितल्यावर ती आम्हाला म्हणायची, ‘‘तो देवच आपला आधार आहे. तुम्हीही त्याची भक्ती करा.’’

१ क. आजीला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काहीही ठाऊक नसूनही तिला त्यांच्यातील देवत्व जाणवणे आणि तिने त्यांचे छायाचित्र पाहून त्यांना ‘श्रीराम’, असे म्हणणे : साधारण मागील २५ – ३० वर्षांपासून आजीला कानांनी ऐकू येणे न्यून झाले. त्यामुळे आम्ही तिच्याशी मोजकेच बोलत होतो. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीही आम्ही तिला फारसे सांगितले नव्हते. मी तिला त्यांचे छायाचित्र दाखवल्यावर तिने त्यांना ‘श्रीराम’, असे म्हणून नमस्कार केला. प्रत्यक्षात आजीला ‘सनातन संस्था किंवा संस्थेचे कार्य’, यांविषयी फार काही ठाऊक नव्हते, तरी ती म्हणायची, ‘‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे) देव आहेत. तू तिकडे आश्रमात देवाकडे गेलीस, ते पुष्कळ चांगले केलेस. तुम्ही तुमच्या आयुष्याचे कल्याण केले.’’

१ ख. आजीच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे : आजीच्या मृत्यूनंतर मी भ्रमणभाषवरून तिच्या पार्थिवाच्या छायाचित्राचे दर्शन घेतले. तिच्या पार्थिवाकडे बघून ‘तिच्या कुठल्याही अपेक्षा राहिल्या नाहीत’, असे मला जाणवत होते आणि माझा भाव जागृत होत होता.

‘हे भगवान श्रीकृष्णा, ‘या भूलोकाच्या भवसागरातून तिची मुक्तता करून तिची आध्यात्मिक प्रगती करून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

२. श्री. सुरेश नामदेव काशेट्टीवार (मोठा मुलगा, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. मृत्यूपूर्वी संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय करण्याचा प्रयत्न करणे : ‘आईच्या मृत्यूच्या २ दिवस आधी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आईसाठी नामजपादी उपाय विचारून घेऊन त्यानुसार नामजप करत होतो. तेव्हा आईही तिला जमेल, तसा न्यास करून नामजप करत होती. त्या वेळी ती मला म्हणाली, ‘‘माझ्याभोवती सर्व देव आले आहेत.’’

२ आ. श्री. सुरेश नामदेव काशेट्टीवार (मोठा मुलगा), श्री. नरेंद्र नामदेव काशेट्टीवार (लहान मुलगा), सौ. वनिता भास्कर चिन्नावार (मोठी मुलगी), श्रीमती दीपाली दीपक नालमवार (मधली मुलगी) आणि सौ. कल्पना विलास लाभशेट्टीवार (लहान मुलगी)

२ आ १. आईने ‘राम’ म्हणत घरातील देवघरासमोर प्राण सोडणे : ‘आईच्या मृत्यूच्या वेळी तिला पलंगावरून उचलून खाली ठेवण्यासाठी दुसर्‍या खोलीत नेत असतांना देवघरासमोर येताच तिने ‘राम’ म्हटले आणि त्याच वेळी तिचा प्राण गेला. यावरून तिची देवाप्रती असलेली उत्कट भक्ती आम्हा सर्वांच्या लक्षात आली.

२ आ २. आईच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

अ. आईचा मृत्यू झाल्यानंतर ‘ती झोपली आहे’, असेच घरातील आम्ही सर्व जण, बाहेरून आलेले नातेवाईक आणि समाजातील लोक यांना वाटले.

आ. आईच्या मृत्यूनंतर घरात ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असा नामजप भ्रमणभाषवर लावून ठेवून आम्ही सर्वांनी तो नामजप केला आणि सकाळी हरिपाठ म्हटला. घरातील वातावरण शांत होते.

इ. अंत्यसंस्काराच्या वेळी तिला अंघोळ घालतांना तिचे शरीर लवचिक होते. अंघोळीसाठी तिला आसंदीत बसवले असता ‘जिवंत मनुष्य जसा आसंदीच्या दोन्ही हातांवर हात ठेवून बसतो, तशी आई आसंदीच्या दोन्ही हातांवर हात ठेवून बसली आहे’, असे वाटत होते.

ई. आईची त्वचा मऊ आणि चमकदार दिसत होती.

उ. तिचा चेहरा पुष्कळ तेजस्वी दिसत होता.

ऊ. आईचा अंत्यविधी निर्विघ्नपणे होऊन सर्व विधी चांगले झाले. ‘हे केवळ ती करत असलेल्या साधनेमुळेच शक्य झाले’, असे घरातील सर्वांना जाणवले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १३.७.२०२२)