कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा, मलकापूर या ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असूनही या उत्सवांना जिज्ञासूंनी चांगला प्रतिसाद दिला. कोल्हापूर येथील महोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले.
१. आजरा येथे बाजारपेठेतील श्री रवळनाथ मंदिर येथील उत्सवासाठी १२० जिज्ञासू उपस्थित होते. मलकापूर येथे श्री नरसिंह मंदिर येथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी १७० जिज्ञासू उपस्थित होते. मलकापूर येथे कोपार्डे येथील सरपंच श्री. कोंडिबा कळंत्रे, शाहूवाडीचे सरपंच श्री. दीपक जाधव, मनसेचे जिल्हा उपप्रमुख श्री. युवराज काटकर उपस्थित होते. या उत्सवासाठी नरसिंह मंदिराचे व्यवस्थापक श्री. महेश कोठावळे यांनी बैठक व्यवस्था, सभागृह, ध्वनीक्षेपक यंत्रणा, तसेच विद्युत् व्यवस्था उपलब्ध करून दिली.
२. इचलकरंजी येथे जिव्हाजी सांस्कृतिक भवन येथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी ४०० जणांची उपस्थिती होती.
३. गडहिंग्लज येथे विनायक प्लाझा, देसाई मंगल कार्यालय येथे झालेल्या उत्सवासाठी ३०८ जिज्ञासूंची उपस्थिती होती. येथे मार्गदर्शन करतांना ‘सव्यासाची गुरुकुलम्’चे प्रधान आचार्य श्री. लखन जाधव म्हणाले, ‘‘परात्पर
गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्र येणारच आहे; मात्र त्यात आपला सहभाग असावा, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. सध्या हिंदूंच्या हत्यांचे सत्र चालू आहे. त्यामुळे आपल्याला किमान स्वत:चे संरक्षण तरी करता यायला हवे. स्वत:मध्ये ब्राह्म आणि क्षात्रतेज निर्माण होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंचेच मार्गदर्शन घ्यावे लागेल.’’
कोल्हापूर शहर येथील उत्सवात ६०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित !
कोल्हापूर शहरात राजारामपुरी येथे लकी बझारच्या माडीवर इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात ६०० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती होती. येथे सभागृहस्थळी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उदंड प्रतिसाद लाभला. पावसामुळे काही जणांना कार्यक्रम चालू झाल्यावर येता आले नाही. त्यामुळे गुरुपौर्णिमा महोत्सवाची वेळ संपल्यावर जिज्ञासू कार्यक्रमासाठी येत होते. गुरुपौर्णिमा उत्सव संपल्यावर रात्री ९.१५ वाजताही जिज्ञासू ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांच्या खरेदीसाठी थांबले होते. या उत्सवास सनातनच्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे आणि सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांची वंदनीय उपस्थिती होती. गडहिंग्लज, इचलकरंजी यांसह सर्वच ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांच्या कक्षास जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद लाभला.
गुरूंचा आशीर्वाद आपल्याला लाभल्यास आपण कधीही चुकीच्या मार्गावर जात नाही ! – शरद माळी, हिंदुत्वनिष्ठ
हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी म्हणाले, ‘‘समाजात यशस्वी झालेल्या अनेकांना गुरूंचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या पाठीशी गुरूंचे आशीर्वाद होते. त्यामुळे त्यांचे जीवन यशस्वी झाले. आपल्यालाही जर गुरूंचा आशीर्वाद लाभला, तर आपण कधीही चुकीच्या मार्गावर जात नाही. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हेही आपल्याला नेहमी ‘चांगला साधक व्हा’ असेच सांगतात. त्यामुळे आपण सर्वांनी प्रतिदिन साधना ही केलीच पाहिजे.’’
उपस्थित मान्यवर – शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, सौ. मनीषा वाडीकर, ‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेचे अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. रघुनाथ टिपुगडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव.
अ. कोल्हापूर शहर गुरुपौर्णिमा येथील विशेष
१. गांधीनगर येथील ‘भारतीय जीवन विमा विभागा’च्या प्रमुख अस्मिता माणगावकर या उत्सवासाठी उपस्थित होत्या आणि त्यांनी ग्रंथही खरेदी केले. याचसमवेत माजी उपमहापौर श्री. प्रकाश पाटील आणि सौ. जयश्री पाटील उपस्थित होते आणि त्यांनीही ग्रंथ खरेदी केले.
२. खुपरे येथील दृष्टीहीन धर्मप्रेमी कु. कांता मोहिते या उपस्थित होत्या. त्यांनी या वेळी समाजातून अर्पणही गोळा केले.
३. ग्रामीण भागातून येणार्या जिज्ञासूंची संख्या मोठ्या प्रमाणात होती. अनेक जिज्ञासू गाड्या करून आले होते.
आ. इचलकरंजी शहर येथील गुरुपौर्णिमेतील विशेष
१. सत्संगातील जिज्ञासू श्रीमती आश्विनी स्वामी या कार्यक्रमस्थळी ३० जिज्ञासूंना घेऊन आल्या.
२. चार प्रशिक्षणवर्गांची मागणी मिळाली
३. हिंदुत्वनिष्ठ श्री. विवेक स्वामी यांनी स्वागत कक्षावर पुढाकार घेऊन सेवा केली आणि छायाचित्र काढण्याच्या सेवेत त्यांनी सहभाग घेतला.
४. इचलकरंजी येथे मार्गदर्शन करतांना हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी म्हणाले, ‘‘सनातन संस्थेने सांगितलेल्या मार्गाने आपण साधना केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होईल. त्यामुळे आपण नियमितणे साधना केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांनी पदोपदी गुरूंचे मार्गदर्शन घेतले आणि मार्गदर्शनामुळे त्यांना यशसुद्धा प्राप्त झाले. आपणही त्याचप्रकारे आपल्या जीवनात गुरूंचे मार्गदर्शन घेऊन धर्मकार्य केले पाहिजे. आज साधू-संत यांना गुंड आणि अन्य धर्मीय यांना ‘हिरो’ अर्थात् साहाय्य करणारे असे दाखवण्यात येत आहे. हे एक मोठे षड्यंत्र असून त्यासाठी आपण जागरूक रहाणे आवश्यक आहे.
इ. निपाणी (कर्नाटक) येथील गुरुपौर्णिमा वैशिष्ट्ये
१. कागल तालुक्यातील बानगे येथील ७४ वर्षीय धर्मप्रेमी श्री. संभाजी कमते यांनी सोहळ्याच्या आदल्या दिवशी उत्साहाने दिवसभर सभागृहात सेवा केली.
२. सोहळा चालू असतांना ३ वेळा विद्युत् पुरवठा खंडित होऊनही जिज्ञासू शांतपणे बसून होते.
ई. आजरा येथील गुरुपौर्णिमेची वैशिष्ट्ये
१. चंदगड येथील ८ धर्मप्रेमी ५० किलोमीटर अंतरावरून उत्सवासाठी आले होते. यातील २ जण १२ जुलै या दिवशी सेवेसाठी आले होते.
हिंदूंनी संघटित होऊन गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा लागेल ! – राजू यादव, शिवसेना, करवीरतालुकाप्रमुख
निपाणी (कर्नाटक) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी कठोर परिश्रम करून गड-दुर्ग यांची निर्मिती केली. गड-दुर्गांवर धर्मांधांनी आक्रमण केले आहे. पुढच्या पिढीला या गड-दुर्गांचा इतिहास शिकवतांना आपल्याला हे गड इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्तही केले पाहिजेत. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने आंदोलन उभे केले असून त्याची नोंद जिल्हाधिकार्यांनाही घ्यावी लागली. आजही अनेक गडांवर अतिक्रमण झाले असून त्यांची पडझडही होत आहे. त्यासाठी हिंदूंनाच संघटित होऊन गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा लागेल, असे आवाहन कोल्हापूर येथील शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी केले. ते कर्नाटकातील निपाणी येथे बी.एस्.एन्.एल्. ऑफिससमोर मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या उत्सवात बोलत होते. येथे ३७५ जिज्ञासूंची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवर – उद्योगपती श्री. महेश शेणॉय, श्री. विजय मेत्राणी, श्री. शीतल भाटले, माजी नगरसेवक श्री. नितीन साळुंखे आणि श्री. नंदू कांबळे, श्रीराम सेनेचे श्री. श्रीनिवास चव्हाण. |